

वॉशिंग्टन : गेमिंग आणि सोशल मीडिया अॅप्सप्रमाणेच आता लोकांना ‘चॅटजीपीटी’चे जणू व्यसन लागू लागले आहे. खुद्द चॅटजीपीटी बनवणार्या ‘ओपन एआय’च्या मते, लोक चॅटजीपीटीवर तासन्तास चॅटिंगमध्ये घालवत आहेत, ज्यामुळे त्यांचा स्क्रीनटाईम वाढत असून, त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. या समस्येवर तोडगा म्हणून, ‘ओपन एआय’ ने आता एक नवीन फीचर लाँच केले आहे, जे वापरकर्त्याला दीर्घकाळ चॅट केल्यानंतर ब्रेक घेण्याची आठवण करून देईल.
‘ओपन एआय’ च्या मते, या फीचरमुळे वापरकर्ते आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) यांच्यात एक निरोगी आणि संतुलित नाते टिकवून ठेवण्यास मदत होईल. कंपनीचे म्हणणे आहे की, हे फीचर वापरकर्त्याचा अनुभव सुधारण्यासोबतच त्यांच्या मानसिक आरोग्याची काळजी घेण्यासाठी तयार करण्यात आले आहे. हे नवीन रिमाइंडर फीचर एका सौम्य सूचनेच्या स्वरूपात काम करेल. चॅटिंगदरम्यान वापरकर्त्यांना एक पॉप-अप मेसेज दिसेल, ज्यामध्ये लिहिलेले असेल : ‘फक्त तपासत आहे, आता ब्रेक घेण्यासाठी ही योग्य वेळ आहे का?’ वापरकर्ते इच्छित असल्यास त्यावेळी चॅट सुरू ठेवू शकतात किंवा थोडा वेळ विश्रांती घेऊ शकतात.
ही सुविधा काही प्रमाणात ‘निंटेंडो’ (Nintendo) सारख्या गेम्समधील फीचरशी मिळतीजुळती आहे, जिथे जास्त वेळ खेळल्यास वापरकर्त्यांना थांबण्याचा आणि स्वतःकडे लक्ष देण्याचा सल्ला दिला जातो. ‘ओपन एआय’ने हा बदल अशा अहवालांनंतर केला आहे, ज्यात असे समोर आले होते की, चॅटजीपीटीची उत्तरे कधी कधी गरजेपेक्षा जास्त सहमती दर्शवतात किंवा चुकीची माहिती देतात. आता हे नवीन ‘ब्रेक रिमाइंडर’ फीचर वापरकर्ता आणि ‘एआय’ यांच्यात संतुलन साधण्यास मदत करेल, ज्यामुळे संवाद अधिक व्यावहारिक आणि जबाबदार होऊ शकेल.