

वॉशिंग्टन : सध्याचा जमाना ‘एआय’चा म्हणजेच ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स’ किंवा कृत्रिम बुद्धिमत्तेचा आहे. सध्या हरेक क्षेत्रात ‘एआय’चा कुशलतेने वापर होत आहे. त्यामध्ये ‘ओपन एआय’च्या ‘चॅट जीपीटी’सारख्या अनेक एआय टूल्सचा समावेश होतो; मात्र त्याचा आणि जगभरातील पाणीटंचाईचा दुरान्वयेही काही संबंध असेल असे आपल्याला निश्चितच वाटणार नाही; मात्र तसा तो असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. एका अभ्यासानुसार, चॅट जीपीटी वापरून फक्त 100 शब्दांचा ई-मेल तयार करण्यासाठी सुमारे 519 मिलिलिटर पाणी खर्च होतं म्हणजे जवळपास एक बाटली पाण्यासारखं!
आपण एआय म्हणजे केवळ इंटरनेट आणि संगणक यंत्रणा समजतो; पण ही यंत्रणा चालवण्यासाठी डेटा सेंटर्स वापरली जातात. या डेटा सेंटर्समध्ये जेव्हा लाखो युजर्सचा डेटा प्रोसेस केला जातो, तेव्हा संगणक खूप गरम होतात. ही यंत्रणा थंड ठेवण्यासाठी वॉटर कूलिंग सिस्टीम वापरली जाते, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पाण्याचा वापर होतो. विशेषतः जेव्हा हे डेटा सेंटर्स कोरड्या आणि गरम हवामानात असतात, तेव्हा पाण्याची गरज आणखी वाढते.
कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, रिव्हरसाईड आणि वॉशिंग्टन पोस्टच्या एका अहवालानुसार, अमेरिकेतील फक्त 10 टक्के कर्मचारी (जवळपास 1.6 कोटी लोक) आठवड्यातून एकदा चॅटजीपीटी वापरून 100 शब्दांचा ई-मेल लिहीत असतील, तर वर्षभरात सुमारे 43.5 कोटी लिटर पाण्याची गरज भासेल. हा पाण्याचा वापर र्होड आयलंडच्या दीड दिवसाच्या वापराइतका आहे. फक्त पाण्याचे नाही, तर चॅटजीपीटी सारखे टूल्स विजेचाही मोठ्या प्रमाणात वापर करतात. 100 शब्दांचा ई-मेल तयार करण्यासाठी 0.14 किलोवॅट तास वीज लागते. हे म्हणजे जवळपास चौदा एलईडी बल्ब एक तास जळवण्याइतकं.
वरील उदाहरणानुसार वर्षभरात 1.21 लाख मेगावॅट वीज लागेल, जी वॉशिंग्टनमधील सर्व घरांच्या 20 दिवसांच्या विजेच्या वापराइतकी आहे. फक्त वापरच नाही, तर जीपीटी-3 सारख्या एआय मॉडेलला ट्रेंड करण्यासाठी 7 लाख लिटर पाणी लागल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं आहे. ‘ओपन एआय’च्या प्रतिनिधी कायला वूड यांच्या म्हणण्यानुसार, एआय प्रणाली अधिक कार्यक्षम आणि कमी संसाधनांमध्ये चालणारी बनवण्यावर कंपनी सातत्यानं काम करत आहे. भविष्यात यामध्ये सकारात्मक बदल घडतील, अशी त्यांची अपेक्षा आहे.