Chandrayaan-2 Discovery | ‘चांद्रयान-2’ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शोधला बर्फाचा साठा!

Chandrayaan-2 Discovery |
Chandrayaan-2 Discovery | ‘चांद्रयान-2’ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर शोधला बर्फाचा साठा!
Published on
Updated on

अहमदाबाद : भारताची महत्त्वाकांक्षी अंतराळ मोहीम ‘चांद्रयान-2’ च्या ऑर्बिटरने चंद्राबद्दल एक अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठा शोध लावला आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावरील सर्वात थंड आणि अंधार्‍या विवरांमध्ये जमिनीच्या अगदी खाली पाण्याचा बर्फ दडलेला असल्याचे नवे पुरावे समोर आले आहेत. अहमदाबाद येथील राष्ट्रीय संशोधन संस्था ‘फिजिकल रिसर्च लॅबोरेटरी’ (PRL) च्या शास्त्रज्ञांनी केलेल्या ताज्या अभ्यासातून ही माहिती समोर आली आहे.

या महत्त्वपूर्ण अभ्यासासाठी भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (इस्रो) चांद्रयान-2 ऑर्बिटरवरील अत्यंत प्रगत रडार डेटाचा वापर करण्यात आला. या डेटाच्या आधारे शास्त्रज्ञांच्या टीमने चंद्रावरील अशा भागांचा नकाशा तयार केला आहे, जे अब्जावधी वर्षांपासून गोठलेल्या स्थितीत आहेत आणि ज्यांना आजवर कोणीही स्पर्श केलेला नाही. चंद्रावर कायमस्वरूपी सावलीत राहणारे काही भाग आहेत, हे शास्त्रज्ञांना आधीपासूनच माहीत होते. मात्र, या अभ्यासात त्याहूनही अधिक टोकाच्या आणि अत्यंत प्रतिकूल वातावरणावर लक्ष केंद्रित करण्यात आले, ज्याला ‘डबली शॅडोइड क्रेटर्स’ म्हटले जाते. ही मोठी आणि आधीच अंधारात असलेली जी विवरे आहेत, त्यांच्या आत असणारे लहान आणि खोल खड्डे आहेत.

दोन वेळा सावलीचे कवच मिळाल्यामुळे या वैशिष्ट्यपूर्ण भागांवर कधीही थेट सूर्यप्रकाश पडत नाही आणि सभोवतालच्या चंद्राच्या जमिनीवरून परावर्तित होणारी उष्णताही येथे पोहोचत नाही. परिणामी, येथील तापमान कमालीचे घसरून उणे 248 अंश सेल्सिअस (248C) पर्यंत खाली जाते. यामुळे ही ठिकाणे संपूर्ण सूर्यमालेतील सर्वात थंड ठिकाणांपैकी एक बनली आहेत. या अति-थंड परिस्थितीत, पाण्याचा बर्फ यांसारखे उडून जाणारे घटक अंतराळात बाष्पीभवन न होता पूर्णपणे स्थिर राहू शकतात. या गडद आणि अथांग अंधारात पाहण्यासाठी शास्त्रज्ञांनी चांद्रयान-2 च्या ‘ड्युअल फ्रीक्वेन्सी सिंथेटिक अपर्चर रडार’ (DFSAR) चा वापर केला. हे अत्याधुनिक उपकरण चंद्राच्या पृष्ठभागावर मायक्रोवेव्ह लहरी सोडते आणि तिथून परत येणार्‍या प्रतिध्वनींचे विश्लेषण करते.

जमिनीखाली गाडलेला बर्फ आणि चंद्रावरील खडबडीत, खडकाळ ढिगारे यांमधील फरक ओळखणे हे चंद्राचा अभ्यास करणार्‍या शास्त्रज्ञांसमोर नेहमीच मोठे आव्हान राहिले आहे. हे आव्हान पेलण्यासाठी ‘पीआरएल’च्या टीमने एक कडक आणि बहुस्तरीय पडताळणी पद्धत विकसित केली. रडारच्या विशिष्ट स्कॅटरिंग (लहरींचे विखुरणे) गुणधर्मांचे विश्लेषण करून, टीमने सभोवतालच्या खडकांच्या तुकड्यांमधून जमिनीखालील बर्फाचे अचूक संकेत वेगळे करण्यात यश मिळवले. यामुळे चंद्राच्या जमिनीखाली पाणी असण्याचे अत्यंत विश्वासार्ह पुरावे आता जगासमोर आले आहेत. भविष्यातील मानवी चंद्र मोहिमा आणि तेथील वास्तव्यासाठी हा शोध अत्यंत क्रांतिकारी मानला जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news