

जिनिव्हा : सर्न प्रयोगशाळेतील ‘लार्ज हॅड्रॉन कोलायडर’मधील (LHC) भौतिकशास्त्रज्ञांनी १० अब्ज कणांमध्ये केवळ एकदाच घडणारी एक अत्यंत दुर्मीळ कण-अभिक्रिया (particle interaction) शोधून काढली आहे. या शोधामुळे विज्ञानासाठी ‘झेप्टोव्हर्स’चे दार उघडले आहे, जे विश्वातील आजवर मोजले गेलेले सर्वात सूक्ष्म अंतराचे परिमाण आहे. १९८४ पासून सुरू असलेल्या तब्बल चार दशकांहून अधिक काळाच्या शोधानंतर, केंब्रिज विद्यापीठाच्या नेतृत्वाखालील ब्रिटन आणि युरोपातील भौतिकशास्त्रज्ञांच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. LHCb प्रयोगातील संशोधकांनी ‘ब्युटी क्वार्क’ असलेल्या एका अस्थिर कणाचा अत्यंत दुर्मीळ क्षण टिपला आहे.
या प्रक्रियेत हा कण अवघ्या दीड ट्रिलियन सेकंदात नष्ट होऊन ‘म्युऑन’ (muons - इलेक्ट्रॉनचे जड भाऊबंद) नावाच्या दोन सूक्ष्म कणांमध्ये रूपांतरित होतो. १० अब्ज ब्युटी कणांमागे अशी घटना केवळ एकदाच घडते. शास्त्रज्ञांनी २०११-२०१८ आणि २०२४-२०२५ मधील कोट्यवधी कणांच्या टकरींचा डेटा एकत्र केला. अब्जावधी कणांच्या गर्दीतून हा अत्यंत क्षीण संकेत शोधण्यासाठी प्रगत ‘मशिन लर्निंग’ आणि अचूक सिलिकॉन डिटेक्टरचा वापर करण्यात आला. हे मोजमाप एका ‘झेप्टोमीटर’च्या स्तरावर झाले आहे, जे एका मीटरचा अब्जावधीचा ट्रिलियनवा भाग (अणूपेक्षाही १० अब्ज पट लहान) इतके सूक्ष्म आहे.
केंब्रिज विद्यापीठाचे मुख्य संशोधक डॉ. हॅरी क्लिफ यांच्या मते, ‘आपण आता झेप्टोव्हर्सच्या उंबरठ्यावर पोहोचलो आहोत.’ या प्रयोगाचे निष्कर्ष सध्याच्या भौतिकशास्त्राच्या ‘स्टँडर्ड मॉडेल’शी (Standard Model) जुळणारे असले, तरी इतक्या सूक्ष्म स्तरावर अभ्यास करण्याची क्षमता प्राप्त झाल्यामुळे भविष्यात डार्क मॅटर आणि विश्वाच्या निर्मितीमागील न उलगडलेली रहस्ये-म्हणजेच ‘नवीन भौतिकशास्त्र’ शोधण्याची सर्वोत्तम संधी शास्त्रज्ञांना मिळाली आहे.