Largest Solar Eclipse | पुढील वर्षी शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण!

तब्बल ६ मिनिटे २३ सेकंद सूर्य पूर्णपणे झाकला जाणार
Largest Solar Eclipse |
Largest Solar Eclipse | पुढील वर्षी शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण!
Published on
Updated on

वॉशिंग्टन : जगभरातील खगोलशास्त्रज्ञ २१ व्या शतकातील सर्वात महत्त्वाच्या खगोलीय घटनेेचे साक्षीदार होण्यासाठी जय्यत तयारी करत आहेत. पुढील वर्षी ऑगस्ट महिन्यात एक पूर्ण सूर्यग्रहण पाहायला मिळणार असून, या घटनेला ‘शतकातील सूर्यग्रहण’ असे नाव देण्यात आले आहे. या अभूतपूर्व घटनेदरम्यान तब्बल ६ मिनिटे आणि २३ सेकंदांसाठी आकाश पूर्णपणे अंधारात बुडून जाईल आणि भरदिवसा रात्रीचा भास होईल.

या अद्‌भुत खगोलीय दृश्यादरम्यान चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकेल. स्पेन, मोरोक्को, इजिप्त आणि सौदी अरेबिया यांसारख्या अनेक देशांमध्ये हे विलोभनीय दृश्य अतिशय स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’नुसार, हे पूर्ण सूर्यग्रहण २ ऑगस्ट २०२७ रोजी खगोलप्रेमींना पाहता येईल. २१ व्या शतकातील सर्वात उत्कृष्ट आणि ऐतिहासिक खगोलीय घटनांपैकी ही एक मानली जात आहे. या सूर्यग्रहणाचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे याचा ‘दीर्घ कालावधी’. इतका मोठा कालावधी असल्यामुळेच हे या शतकातील सर्वात मोठे पूर्ण सूर्यग्रहण ठरणार आहे.

खगोलशास्त्रज्ञांच्या मते, पृथ्वीवर यापूर्वी इतक्या प्रदीर्घ कालावधीचे सूर्यग्रहण १९९१ मध्ये पाहिले गेले होते. तर यानंतर असा दुर्मीळ योग थेट २११४ मध्ये म्हणजेच तब्बल ८८ वर्षांनंतर येणार आहे. जेव्हा चंद्र आपली प्रदक्षिणा पूर्ण करताना पृथ्वी आणि सूर्याच्या मधोमध अगदी एका सरळ रेषेत येतो, तेव्हा चंद्राची सावली पृथ्वीवर पडते आणि सूर्यग्रहण होते. मात्र, प्रत्येक वेळी या ग्रहणाचा कालावधी सारखा नसतो. पृथ्वी, चंद्र आणि सूर्य यांच्यातील अंतरातील बदलांमुळे ग्रहणाचा वेळ ठरतो. वैज्ञानिक गणितानुसार, २ ऑगस्ट २०२७ रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाच्या वेळी चंद्र पृथ्वीच्या अत्यंत जवळ असेल, ज्यामुळे तो आकाराने मोठा दिसेल. सूर्य पृथ्वीपासून त्याच्या कमाल अंतरावर (सर्वात दूर) असेल, ज्यामुळे तो आकाराने नेहमीपेक्षा लहान दिसेल. खगोलीय संस्थांची ही अशी स्थिती अतिशय दुर्मीळ मानली जाते.

सूर्य लहान आणि चंद्र मोठा दिसणार असल्यामुळे चंद्र सूर्याला जास्त वेळ झाकून ठेवू शकेल आणि याच कारणामुळे या ग्रहणाचा कालावधी असाधारणपणे मोठा असेल. या ग्रहणाची सुरुवात स्पेनच्या वर अटलांटिक महासागरातून होईल आणि स्पेनच्या दक्षिण भागात ते सर्वात आधी पाहता येईल. यानंतर हे ग्रहण उत्तर आफ्रिकेतील मोरोक्को, अल्जीरिया, ट्युनिशिया, लिबिया, इजिप्त, सुदान येथून पुढे सरकत सौदी अरेबिया आणि येमेनच्या काही भागांमध्ये दिसेल. भारतात राहणाऱ्या नागरिकांना मात्र हे सूर्यग्रहण पाहता येणार नाही, कारण या ग्रहणाचा मार्ग भारतीय उपखंडातून जाणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news