

अंकारा (तुर्की) : गेल्या 10,000 वर्षांपासून मानवाच्या सोबत राहणार्या मांजरांनी आपल्याला हवे ते मिळवण्यासाठी ‘म्याव-म्याव’ करण्याची कला अवगत केली आहे. मात्र, आता एका नवीन संशोधनातून एक रंजक बाब समोर आली आहे. तुर्कीमधील संशोधकांच्या मते, मांजर महिलांच्या तुलनेत पुरुषांचे स्वागत करताना अधिक आवाज काढतात किंवा ओरडतात. आपल्याला हवे असलेले लक्ष वेधून घेण्यासाठी मांजरींनी अवलंबलेली ही एक युक्ती असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
तुर्कीच्या बिल्केंट विद्यापीठातील ‘अॅनिमल बिहेविअर अँड ह्युमन-अॅनिमल इंटरअॅक्शन रिसर्च ग्रुप’चे मुख्य संशोधक कान केरमन यांनी सांगितले की, ‘मांजर त्यांच्याशी जोडलेल्या व्यक्तींचे वर्गीकरण करू शकतात आणि त्यानुसार आपल्या प्रतिसादात बदल करतात. यावरून असे सिद्ध होते की, मांजरी या केवळ यंत्रासारख्या नसून त्यांच्याकडे प्रगत संज्ञानात्मक क्षमता आहे, ज्यामुळे त्या मानवाशी जुळवून घेऊन राहतात.’
अनेकांचा असा समज असतो की मांजरी एकलकोंड्या असतात आणि त्या केवळ अन्नासाठी माणसांच्या जवळ येतात. परंतु, केरमन यांच्या मते, मांजरी अपेक्षेपेक्षा जास्त सामाजिक प्राणी आहेत. त्या केवळ अन्नासाठी नाही, तर सामाजिक संपर्क आणि प्रेमाचे नाते निर्माण करण्यासाठी आपल्या मालकांशी संवाद साधतात. ‘एथॉलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या अभ्यासानुसार, घराबाहेरून आलेल्या माणसाचे स्वागत करणे हा मांजरींच्या सामाजिक वर्तनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
मांजरी मानवाचे स्वागत कसे करतात, हे पाहण्यासाठी संशोधकांनी 40 मांजर मालकांना कॅमेरे दिले. त्यांना कामावरून घरी परतल्यानंतर पहिल्या 100 सेकंदांतील मांजरीसोबतचा संवाद चित्रित करण्यास सांगण्यात आले. प्रयोगाअंती 31 सहभागींच्या व्हिडीओचे विश्लेषण करण्यात आले. यात असे आढळले की, जेव्हा पुरुष मालक घरात प्रवेश करतो, तेव्हा मांजरी महिलांच्या आगमनाच्या तुलनेत कितीतरी जास्त ओरडतात किंवा आवाज काढतात.