

टोकियो : जपानमधील ‘सेटो इनलँड सी’ मध्ये वसलेले अवघ्या 0.2 चौरस मैलाचे ‘आओशिमा’ बेट सध्या एका मोठ्या बदलाच्या उंबरठ्यावर आहे. एकेकाळी गजबजलेले हे बेट आता केवळ 80 रानटी मांजरे आणि 3 वृद्ध नागरिकांचे निवासस्थान उरले आहे. जपानमधील 11 ‘कॅट आयलंडस्’पैकी हे सर्वात प्रसिद्ध बेट आहे, जिथे माणसांच्या तुलनेत मांजरांची संख्या कित्येक पटीने जास्त आहे.
आर्थिक संधींचा अभाव आणि वाढत्या वयोमानामुळे, येत्या पाच वर्षांत आओशिमा बेट पूर्णपणे मानवरहित होण्याची शक्यता आहे. आश्चर्याची बाब म्हणजे, केवळ मानवांचीच नाही तर मांजरांची संख्याही येथे वेगाने घटत आहे. दहा वर्षांपूर्वी या बेटावर सुमारे 200 मांजरे होती. मात्र, 2018 मध्ये राबवण्यात आलेल्या नसबंदीच्या मोठ्या मोहिमेनंतर ही संख्या निम्म्यावर आली आहे. तेव्हापासून येथे एकाही पिलाचा जन्म झालेला नाही. सध्या अस्तित्वात असलेली सर्व मांजरे 7 वर्षांहून अधिक वयाची आहेत.
दशकांपासून चाललेल्या ‘इनब—ीडिंग’मुळे (अंत:प्रजनन) यातील एक तृतीयांश मांजरे विविध आजारांनी ग्रस्त आहेत. बेटावरील 70 वर्षीय रहिवासी नाओको कामिमोटो, ज्यांना स्थानिक पातळीवर ‘कॅट ममा’ म्हणून ओळखले जाते, त्या या मांजरांचा सांभाळ करतात. त्या म्हणतात, ‘एक दिवस असा येईल जेव्हा येथे ना माणसे उरतील ना मांजरे. जोपर्यंत आम्ही इथे आहोत, तोपर्यंत त्यांची योग्य काळजी घेणे हेच आमचे कर्तव्य आहे.’ 17 व्या शतकात आओशिमा बेटावर मानवी वस्ती सुरू झाली. कालांतराने हे मासेमारीचे मोठे केंद्र बनले आणि येथील लोकसंख्या 900 पर्यंत पोहोचली.
मासेमारीची जाळी कुरतडणार्या उंदरांचा बंदोबस्त करण्यासाठी मच्छीमारांनी येथे काही मांजरे आणली होती. मात्र, 20 व्या शतकात मासेमारीचा उद्योग मंदावल्याने लोक मुख्य भूभागाकडे स्थलांतरित झाले आणि जाताना आपली मांजरे मागे सोडून गेले, ज्यांची संख्या नंतर झपाट्याने वाढली. संपूर्ण जपानमधून येणार्या अन्न दानावर या मांजरांचे पोषण होते. ही मांजरे वादळामुळे कोसळलेल्या जुन्या पडक्या घरांमध्ये राहतात. 2023 च्या एका अभ्यासानुसार, येथील बहुतांश मांजरे केशरी किंवा ठिपक्यांच्या रंगाची आहेत. मर्यादित पूर्वजांपासून त्यांची पैदास झाल्याने त्यांच्यात अनुवांशिक समस्या निर्माण झाल्या आहेत.