Kandula Jessie Mission ShaktiSat | वडील करतात सुतारकाम, मुलगी जाणार अंतराळात!

१०८ देशांतील विद्यार्थ्यांना मागे टाकत झळकवली यशाची पताका
Kandula Jessie Mission ShaktiSat  |
Kandula Jessie Mission ShaktiSat | वडील करतात सुतारकाम, मुलगी जाणार अंतराळात!
Published on
Updated on

अमरावती (आंध्र प्रदेश) : यशाची कथा केवळ अनेक वर्षांचा संघर्ष किंवा केवळ वयावर अवलंबून नसते, तर ती जिद्द आणि बुद्धिमत्तेच्या जोरावरही लिहिता येते. हेच सिद्ध करून दाखवले आहे दहावीत शिकणाऱ्या एका १४ वर्षांच्या विद्यार्थिनीने! एकीकडे दहावीचे विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेत उत्तम गुण मिळवण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करत असतात, तर दुसरीकडे ही विद्यार्थिनी जगातील पहिल्या 'ऑल गर्ल्स ल्यूनार क्युबसॅट मिशन' (Mission ShaktiSat) मध्ये सहभागी होण्याची तयारी करत होती.

१०८ देशांतील हजारो मुलींना मागे टाकत आंध्र प्रदेशातील एका अत्यंत सामान्य कुटुंबातील सुताराच्या मुलीने हे मोठे यश संपादन केले आहे. कंडुला जेसी असे या हुशार विद्यार्थिनीचे नाव आहे. ‘मिशन शक्तीसॅट' हा जगातील पहिला आंतरराष्ट्रीय 'ऑल गर्ल्स ल्यूनर क्युबसॅट' कार्यक्रम आहे. या मोहिमेसाठी जगभरातील १०८ देशांमधून सुमारे १२,००० मुलींनी नोंदणी केली होती. या खडतर स्पर्धेतून जगभरातून निवड झालेल्या विद्यार्थिनींमध्ये भारतातील २० मुलींचा समावेश आहे. विशेष म्हणजे, या २० भारतीय मुलींमध्ये आंध्र प्रदेशच्या कंडुला जेसीने आपले स्थान निश्चित केले आहे. कंडुला जेसीचे कुटुंब मूळचे आंध्र प्रदेशातील आहे. तिचे वडील सुतारकाम करतात. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने तिच्या वडिलांना तिला खासगी शाळेतून काढून सरकारी शाळेत घालावे लागले.

सध्या कंडुला आंध्र प्रदेशातील धवलेश्वरम येथील 'जिल्हा परिषद गर्ल्स हायस्कूल' या सरकारी शाळेत दहावीत शिकत आहे. याच सरकारी शाळेने आणि तिथल्या शिक्षकांनी आज तिला आंतरराष्ट्रीय स्तरावर नवी ओळख मिळवून दिली आहे. कंडुलाची विज्ञान विषयातील आवड पाहून तिच्या शाळेतील 'फिजिकल सायन्स'च्या शिक्षिका आणि 'अटल टिंकरिंग लॅब'च्या प्रभारी मणिमाला यांनी तिला 'मिशन शक्तीसॅट'बद्दल सांगितले आणि तिची नोंदणी करून घेतली. सुरुवातीला या कोर्सेसचे क्लासेस आधीच सुरू झाले होते. परंतु शिक्षिकेच्या विशेष प्रयत्नांमुळे कंडुलाला या मोहिमेत सहभागी होण्याची संधी मिळाली. त्यानंतर कंडुलाने मिळालेल्या संधीचे सोने करत रात्रंदिवस मेहनत केली.

'मिशन शक्तीसॅट'मधील निवडीचा हा प्रवास मुळीच सोपा नव्हता. दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेची तयारी करत असतानाच कंडुला दररोज ऑनलाईन क्लासेसला उपस्थित राहायची. या कार्यक्रमात ५५० हून अधिक सेशन्स आणि २१ मॉड्यूल्स समाविष्ट होते, ज्यांचा अभ्यासक्रम तिच्या वयाच्या मानाने खूप ॲडव्हान्स (उच्च) पातळीचा होता. या आंतरराष्ट्रीय मोहिमेत शिकण्यासाठी आणि संवाद साधण्यासाठी कंडुलाने इंग्रजी भाषाही आत्मसात केली. अत्यंत जिद्दी असलेल्या कंडुला जेसीचे भविष्यात भारताच्या ‘इस्रो' या अंतराळ संस्थेत शास्त्रज्ञ बनून देशाच्या अंतराळ मोहिमांमध्ये योगदान देण्याचे मोठे स्वप्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news