

कोलकाता : जगभरात घटपर्णीसारख्या अनेक मांसाहारी वनस्पतीही आहेत. या वनस्पती छोट्या कीटकांना पकडून त्यांच्यामधील पोषक घटक शोषून घेत असतात. तयापैकी एक वनस्पती म्हणजे ड्रॉसेरा किंवा सनड्युज. अशी वनस्पती प. बंगालमध्येही आढळून येते. मात्र, छोटे किटक खाणारी ही लहान आकाराची वनस्पती माणसासाठीही धोकादायक असल्याच्या गैरसमजातून तिच्यावर मानवी संकट आले आहे!
प. बंगालमधील बैंकुरा तसेच पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील अनेक वनक्षेत्रांमध्येही ही वनस्पती आढळते. खडकाळ भूमीत ही वनस्पती उगवते. तिचा आकार छोटा असतो आणि त्यावर लालसर रंगाची गोल पाने असतात. या पानांवर दवबिंदूंंप्रमाणे दिसणारा चिकट पदार्थ असतो. त्यामुळेच या वनस्पतीला ‘सनड्युज’ असे म्हटले जाते. या पदार्थाकडे किटक आकर्षित होतात व त्यामध्ये चिकटतात. त्यानंतर ही वनस्पती या कीटकांमधील पोषक घटक शोषून घेते. प. बंगालच्या गुर्गुरीपाल, चंद्रा, लालगढ अशा अनेक जंगलांमध्ये ही वनस्पती आढळते. मिदनापूर वनविभाग अशी रोपे जिथे जिथे आढळतात तिथे त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. याचे कारण म्हणजे या मांसाहारी वनस्पतीपासून मानवालाही धोका असल्याचा गैरसमज अनेक लोकांमध्ये असल्याने ते ही वनस्पती नष्ट करीत आहेत. ड्रॉसेरा किंवा सनड्युज वनस्पतीच्या किमान 194 प्रजाती आहेत. त्यांच्या पानांमध्ये असलेल्या विशिष्ट ग्रंथींच्या सहाय्याने त्या पकडलेले किटक पचवतात. जगभरात अनेक ठिकाणी ही वनस्पती आढळते.