

नवी दिल्ली : वेलची हा भारतीय स्वयंपाकघरात हमखास वापरला जाणारा एक महत्त्वाचा मसाला आहे. बहुतेक लोकांना फक्त हिरव्या वेलचीबद्दलच माहिती आहे; पण वेलचीचे इतर रंग आणि प्रकारही असतात, ज्यांचे उपयोग, चव आणि औषधी गुणधर्म वेगवेगळे असतात. पाहूयात वेलचीचे विविध प्रकार, त्यांचे वैशिष्ट्य आणि योग्य उपयोग...
वेलचीमध्ये उष्णतेपासून संरक्षण, अन्नपचन सुधारणा, दुर्गंधी नष्ट करणे आणि अन्य औषधी गुणधर्म भरपूर असतात. भारतात विशेषतः केरळ आणि कर्नाटकमध्ये याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते.
हिरवी वेलची : हा सर्वात सामान्य आणि लोकप्रिय प्रकार आहे. तिची चव गोड आणि सौम्य असते. काळी वेलची : ही वेलची चवीला तीव्र, धुरकट आणि तिखट असते. पांढरी वेलची : हिरव्या वेलचीलाच ब्लीच करून तयार केलेली ही वेलची आहे. हिची चव सौम्यच असते.
लाल वेलची : क्वचित दिसणारा प्रकार आहे. ही वेलची आशियाई आणि चिनी पदार्थांमध्ये वापरली जाते. हिरवी वेलची गोड पदार्थांमध्ये वापरण्यासाठी सर्वोत्तम मानली जाते. खीर, श्रीखंड, साखरपारा, मोदक, लाडू, चहा आणि बासमती भातातही ही वेलची घालतात. यामुळे पदार्थाला एक सौम्य आणि मधुर चव येते. काळ्या वेलचीची चव आणि सुगंध अधिक तीव्र असतो. त्यामुळे ती पुलाव, नॉनव्हेज ग्रेव्हीज, याखनी, बिर्याणी, गरम मसाला आणि करीमध्ये वापरली जाते. ती पदार्थाला एक मजबूत आणि मसालेदार चव देते. पांढरी वेलची ही हिरव्या वेलचीचाच ब्लीच केलेला प्रकार आहे. याचा सुगंध आणि चव सौम्य असते. अनेकदा खवय्यांना ती सौंदर्यद़ृष्टीने आकर्षक वाटते आणि बेकरी प्रोडक्टस् किंवा सौम्य गोड पदार्थांमध्ये तिचा वापर केला जातो. लाल वेलची भारतात फारशी सामान्य नाही; पण चिनी आणि थायी खाद्यसंस्कृतीत ती वापरली जाते. तिचा स्वाद थोडा वेगळा असतो. विशेषतः, शिजवलेली किंवा स्टू टाईप डिशेसमध्ये तिचा उपयोग होतो.