

लंडन : उच्च वेग, जबरदस्त पकड आणि गुरुत्वाकर्षणालाही हरवणारी क्षमता हे सगळं एकाच कारमध्ये शक्य आहे का? ब्रिटनमधील मॅकम्युट्री ऑटोमोटिव्हने तयार केलेली स्पेर्लिंग प्युअर ही इलेक्ट्रिक हायपरकार याच प्रश्नाचं थक्क करणारं उत्तर देते. ही कार खास बनवते ती तिची ‘डाऊनफोर्स ऑन डिमांड’ प्रणाली. कारच्या तळाशी बसवलेल्या दोन हाय-स्पीड फॅन्समुळे ती अक्षरशः रस्त्याला चिकटते. हे फॅन्स प्रतिमिनीट 23,000 फेर्यांनी फिरत जवळपास 2,000 किलोपर्यंत डाऊनफोर्स निर्माण करतात जो कारच्या स्वतःच्या वजनापेक्षाही जास्त आहे. त्यामुळे ही कार अगदी व्हॅक्युम क्लीनरसारखी जमिनीवर ‘सक्शन’ तयार करते.
वेग आणि परफॉर्मन्समध्ये नवा मापदंड
100 केडब्ल्यूएच बॅटरीवर चालणारी ही कार 0 ते 60 मैल प्रतितास वेग फक्त 1.55 सेकंदात गाठते, तर टॉप स्पीड सुमारे 190 मैल प्रतितास आहे. आकाराने लहान असली तरी तिची क्षमता प्रचंड आहे.
उलटी चालणारी कार जगातील पहिला प्रयोग
या तंत्रज्ञानामुळे एक अनोखा प्रयोग शक्य झाला. कारला पूर्णपणे उलटी करून चालवणे! कंपनीने विशेष रिंगवर हा प्रयोग यशस्वी करून दाखवला, ज्यामुळे मोटारस्पोर्टच्या संकल्पनांनाच आव्हान मिळालं.
रेकॉर्डब्रेकिंग कामगिरी
2022 मध्ये, माजी एफ 1 ड्रायव्हर मॅक्स चिल्टन यांच्या हातून या कारने गुडवूड फेस्टिव्हल ऑफ स्पीडमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केला. तसेच, टॉफ गिअरच्या ट्रॅकवरही तिने सर्वात वेगवान लॅपचा विक्रम मोडला.
ही टेक्नॉलॉजी भविष्यात 1 आणि इतर मोटारस्पोर्टसाठी गेमचेंजर ठरू शकते. जास्त सुरक्षित, जवळून स्पर्धा आणि अधिक नियंत्रण हे सर्व शक्य होऊ शकतं.
मर्यादित उत्पादन, प्रचंड किंमत
फक्त 100 गाड्या तयार केल्या जाणार असून प्रत्येकाची किंमत सुमारे 995,000 पौंड (रु.10 कोटींपेक्षा जास्त) आहे. सध्या ही कार केवळ ट्रॅक वापरासाठीच उपलब्ध आहे. स्पेर्लिंग ही केवळ एक कार नाही, तर मोटरस्पोर्टच्या भविष्यातील झलक आहे जिथे वेग, विज्ञान आणि कल्पकता यांचा संगम दिसतो.