Fighting Cancer | कर्करोगाने दिली जगण्याची दृष्टी

Fighting Cancer  |
Fighting Cancer | कर्करोगाने दिली जगण्याची दृष्टी
Published on
Updated on

पोर्टलँड : कर्करोग हा केवळ शरीरावर आघात करत नाही, तर तो संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य मुळापासून हादरवून टाकतो. वयाच्या १२ व्या वर्षी ‘ऑस्टिओसारकोमा’ (हाडांचा कर्करोग) चे निदान झालेली सबिना मॅकमॅहॉन आणि तिच्या कुटुंबाने गेल्या पाच वर्षांत हा भयंकर अनुभव घेतला आहे. पाच वेळा झालेला कर्करोगाचा पुनरुद्‌भव, किमोथेरपीच्या वेदना, गुडघ्याची मोठी शस्त्रक्रिया आणि सततचा दवाखान्यांचा प्रवास यांमुळे सबिनाचे हसरे-खेळते बालपण हिरावले गेले. तिच्या कुटुंबाचे सामान्य जीवन, घराची शांतता आणि सुरक्षिततेची भावना कर्करोगाने नष्ट केली.

सबिनाचे वडील शॉन सांगतात, ‘‘कर्करोगाने आमच्याकडून खूप काही हिरावून घेतले हे खरे आहे; पण त्याने आम्हाला काही गोष्टी दिल्यादेखील.’’ या आजारपणामुळे ‘आयुष्य एकदाच मिळते’ या तत्त्वाने जगण्याची जाणीव कुटुंबाला झाली. हॉस्पिटल्सच्या फेऱ्यांमध्ये वडील-मुलीचे नाते अधिक घट्ट झाले, जे कदाचित सामान्य आयुष्यात शक्य झाले नसते.

आई केटने या दुःखातून पूर्वजांप्रमाणे संकटांवर मात करण्याचे आत्मबळ शोधून काढले, तर लहान भाऊ चार्लीने अनपेक्षित परिस्थितीशी जुळवून घेण्याची परिपक्वता मिळवली. स्वतः सबिनाला या आजाराने एक सशक्त गायिका, गीतकार आणि समाजप्रबोधक बनवले. किमोथेरपीच्या वेदना तिने आपल्या संगीतात उतरवल्या आणि पहिला अल्बम साकारला. आज ती बालकांच्या कर्करोग संशोधनासाठी आवाज उठवत आहे. १७ वर्षांची सबिना म्हणते की, कर्करोगाने वेदना दिल्या असल्या, तरी त्याने तिला तिच्यातील खरी ताकद आणि दुसऱ्यांच्या आयुष्यात आशेचा किरण बनण्याचे ध्येय मिळवून दिले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news