

बर्लिन : जर्मनीतील ‘मॅग्डेबर्ग वॉटर ब्रिज’ हा जगभरातील अभियांत्रिकी आणि स्थापत्यशास्त्राचा एक अतिशय अनोखा व अद्भुत नमुना मानला जातो. सामान्यतः पूल हे रस्ते किंवा रेल्वे वाहतुकीसाठी गाड्या आणि माणसे नदी, दरी ओलांडण्यासाठी बांधले जातात. मात्र, हा असा एक पूल आहे, ज्यावरून गाड्या किंवा माणसे नव्हे, तर चक्क कालवा आणि त्यावरून जहाजे वाहतूक करतात.
हा पूल ‘एल्बे नदीवर’ उभारण्यात आला असून, त्यावरून ‘एल्बे-हाफेल कॅनॉल’ आणि ‘मित्तेलँड कॅनॉल’ हे दोन मोठे जलमार्ग एकमेकांना जोडले जातात. म्हणजेच सोप्या शब्दांत सांगायचे तर, एका नदीच्यावरून जणू दुसरी नदी वाहते. ९१८ मीटर (सुमारे ३,०१२ फूट) लांबीचा हा पूल जगातील सर्वात लांब पाण्याचा पूल आहे. यातील ६९० मीटर भाग जमिनीवर आणि २२८ मीटर भाग थेट एल्बे नदीच्या वर आहे. हा पूल ३४ मीटर रुंद आणि ४.२५ मीटर खोल आहे. ज्यामुळे मोठमोठी मालवाहू जहाजे यावरून सहज ये-जा करू शकतात.
या पुलाच्या बांधकामाची संकल्पना १९३० च्या दशकातच मांडण्यात आली होती. परंतु दुसऱ्या महायुद्धामुळे आणि त्यानंतर जर्मनीच्या झालेल्या विभाजनामुळे (पूर्व आणि पश्चिम जर्मनी) हे काम पूर्ण ६० वर्षे रखडले होते. जर्मनीच्या एकीकरणानंतर १९९७ मध्ये या पुलाचे बांधकाम पुन्हा सुरू करण्यात आले आणि तब्बल ६ वर्षे अहोरात्र काम केल्यानंतर २००३ मध्ये हा अभूतपूर्व पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. यासाठी सुमारे ५० कोटी युरो (अंदाजे ४,५०० कोटी रुपयांपेक्षा जास्त) खर्च आला होता.
हा पूल बांधण्यापूर्वी जहाजांना एका कॅनॉलमधून दुसऱ्या कॅनॉलमध्ये जाण्यासाठी एल्बे नदीतून १२ किलोमीटरचा लांबलचक आणि धोकादायक वळसा घालावा लागत होता. तसेच नदीतील पाण्याची पातळी कमी-जास्त झाल्यावर जहाजांवरील माल उतरवावा लागत असे. मॅग्डेबर्ग वॉटर ब्रिजमुळे हा १२ किलोमीटरचा वळसा पूर्णपणे वाचला असून, बर्लिन आणि जर्मनीच्या औद्योगिक शहरांमधील जलवाहतूक अत्यंत सुलभ, वेगवान आणि सुरक्षित झाली आहे. आज हा पूल केवळ मालवाहतुकीसाठीच नाही, तर जगभरातील पर्यटकांसाठी अत्यंत आकर्षणाचा केंद्रबिंदू बनला आहे. जहाजे पुलावरून चालताना पाहणे हा पर्यटकांसाठी एक थक्क करणारा अनुभव असतो.