

ओंटारियो : कॅनडातील वैज्ञानिकांनी एक अत्याधुनिक स्पीकर प्रणाली तयार केली आहे, जी इतक्या बारकाईने थ्रीडी ध्वनिजग निर्माण करते की माणसाच्या कानाला तो आवाज अक्षरशः प्रत्यक्ष जगातल्यासारखाच वाटतो. ‘ऑडिओ डोम’ (AudioDome) नावाची ही 11 फूट (3.4 मीटर) उंचीची स्पीकर प्रणाली ओंटारियोतील एका बंद प्रयोगकक्षात उभारण्यात आली आहे. ती अत्याधुनिक ऑडिओ-रेंडरिंग तंत्राचा वापर करून समृद्ध आणि अचूक ध्वनी क्षेत्र निर्माण करते. त्यामुळे आवाज ज्या ठिकाणी नोंदवला गेला होता, तिथेच ऐकत असल्याचा अनुभव मिळतो, म्हणजेच ऐकणार्या व्यक्तीला जगात कुठेही ध्वनीच्या माध्यमातून पोहोचवता येते. एकप्रकारे ही थ्रीडी आवाजाची भिंतच आहे!
या प्रणालीची परिणामकारकता तपासण्यासाठी वैज्ञानिकांनी अनेक व्यक्तींवर चाचण्या केल्या. 15 एप्रिल The Journal of the Acoustical Society of America मध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनानुसार, ‘ऑडिओ डोम’ इतके बारकाईने आणि अचूक ध्वनिजग निर्माण करू शकतो की, माणसाच्या ऐकण्याच्या क्षमतेच्या सीमाही त्याने पार केल्या. ‘ही प्रणाली वैज्ञानिकांना एकाच वेळी कठोर प्रयोगात्मक नियंत्रण राखत, माणसाच्या ऐकण्याच्या क्षमता आणि त्यामागील मेंदूच्या प्रक्रिया अभ्यासण्यासाठी एक सजीव, गुंतागुंतीचे आणि त्रिमितीय ध्वनिजग वापरता येईल अशी सुविधा देते,’ असे या अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि ओंटारियाच्या वेस्टर्न युनिव्हर्सिटीतील न्यूरोसायन्स आणि संगीत संज्ञानशास्त्राचे पदवीधर विद्यार्थी निमा झारगारनेझाद यांनी म्हटले आहे.
सध्याची साऊंड टेक्नॉलॉजी, जसे की सिंगल-चॅनेल (SC) किंवा व्हेक्टर-बेस्ड अॅम्प्लिट्यूड पॅनिंग (VBAP), इमर्सिव्ह अनुभव देण्याचा प्रयत्न करतात, पण त्यांची मर्यादा ही की, SC प्रणालीत, आवाजाच्या स्रोताचे स्थान स्पीकरच्या भौतिक जागेपुरतेच मर्यादित राहते. तसेच VBAP प्रणालीत, तिन्ही स्पीकरमधील आवाजाची तीव्रता बदलून एका आभासी स्रोताचा भास निर्माण केला जातो. पण अभ्यासानुसार, या कोणत्याही प्रणालीइतकी विस्तृत आणि अचूक त्रिमितीय ध्वनिजग निर्माण करण्याची क्षमता ambisonic पॅनिंग या तंत्राची आहे, जी ‘ऑडिओ डोम’ मध्ये वापरली गेली आहे.