

पॅरिस : २० व्या शतकातील फ्रान्सचे एक महान साहित्यिक, स्वातंत्र्यसैनिक आणि पुढे देशाचे प्रभावी ‘संस्कृती मंत्री’ बनलेले आंद्रे मालरो यांचा पूर्वेतिहास अत्यंत वादग्रस्त आणि थरारक होता. तरुण वयात स्वतःच्या विलासी जीवनशैलीचा खर्च भागवण्यासाठी त्यांनी आपल्या पत्नीसोबत कंबोडियातील प्राचीन मंदिरांमधून अमूल्य मूर्ती चोरण्याचा कट रचला होता; परंतु त्यांची ही चोरी पकडली गेली आणि याच अपयशाने पुढे आशियाई देशांच्या सांस्कृतिक वारसा हक्काच्या लढ्याला जन्म दिला.
खोट्या संशोधनाचा बनाव आणि चोरीचा कट
१९२३ मध्ये २२ वर्षांचे तरुण आंद्रे मालरो आणि त्यांची पत्नी क्लारा मालरो व्हिएतनामच्या हनोई शहरात पोहोचले. तेथे त्यांनी ‘स्कूल फॉर द फार ईस्ट’ या फ्रेंच संस्थेकडून कंबोडियातील जंगलात खमेर साम्राज्याच्या प्राचीन रस्त्यांचे ‘संशोधन’ करण्यासाठी परवाना मिळवला. अधिकाऱ्यांना संशय येऊ नये म्हणून त्यांनी पॅरिसमधील वसाहत कार्यालयाची शिफारसपत्रेही आणली होती; परंतु हा सर्व एक बनाव होता. आंद्रे मालरो यांचे मूळ उद्दिष्ट १० व्या शतकातील जगप्रसिद्ध ‘बंतेय स्रेई’ या लाल वालुकामय दगडापासून बनवलेल्या हिंदू मंदिरातील अत्यंत सुबक आणि मौल्यवान मूर्ती, कोरीव नक्षीकाम चोरून ते पाश्चात्त्य बाजारपेठेत विकणे हे होते.
वसाहतवादाचा काळा कालखंड
१९ व्या शतकापासून फ्रान्सने इंडोचायना (व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस) वर आपले नियंत्रण मिळवले होते. १८६० मध्ये फ्रेंच निसर्गवादी हेन्री मुहोट यांनी ‘अंगकोर वाट’ या प्राचीन खमेर राजधानीचे अवशेष जगासमोर आणले. त्यानंतर फ्रेंच लष्करी अधिकारी आणि प्रशासकांनी कंबोडियातील ऐतिहासिक संपत्तीची मोठ्या प्रमाणावर लूट केली आणि ती पॅरिसमधील संग्रहालयांमध्ये पाठवली. जरी नंतरच्या काळात फ्रेंच सरकारने या अवशेषांच्या निर्यातीवर बंदी घातली असली, तरी जंगलातील अनेक मंदिरे असुरक्षित होती आणि याच गोष्टीचा फायदा मालरो दाम्पत्याला घ्यायचा होता. अपयश आणि महानायक बनण्याचा प्रवास आंद्रे मालरो यांनी मंदिरातून दगडी मूर्ती आणि नक्षीकाम तोडून काढले खरे; परंतु कंबोडियातून बाहेर पडण्यापूर्वीच फ्रेंच प्रशासनाने त्यांना रंगेहाथ पकडले.
या चोरीच्या प्रकरणामुळे कंबोडिया आणि आशियाई देशांच्या ऐतिहासिक ठेव्याच्या मालकी हक्कावर आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिल्यांदाच मोठी चर्चा सुरू झाली. या गंभीर गुन्ह्यातून सुटल्यानंतर आंद्रे मालरो यांचे जीवन पूर्णपणे बदलले. पुढे त्यांनी फ्रेंच प्रतिकार चळवळीत भाग घेतला, ‘मॅन्स फेट’ सारख्या जागतिक दर्जाच्या कादंबऱ्या लिहिल्या, ज्यासाठी त्यांना साहित्याच्या नोबेल पुरस्कारासाठी तब्बल १०० वेळा नामांकित करण्यात आले होते. पुढे राष्ट्राध्यक्ष चार्ल्स डी गॉल यांच्या कार्यकाळात ते फ्रान्सचे ‘संस्कृती मंत्री’ बनले. एक चोर ते जागतिक सांस्कृतिक महानायक, असा आंद्रे मालरो यांचा हा प्रवास इतिहास संशोधकांसाठी आजही कौतुकाचा आणि तितकाच विरोधाभासी ठरला आहे.