

नवी दिल्ली : सध्याच्या काळात अवयव प्रत्यारोपणामुळे अनेकांना नवे जीवन मिळत आहे. केवळ माणसाबाबतच नव्हे तर पशु-पक्ष्यांबाबतही प्रत्यारोपणातून नवजीवन देण्यासाठीचे प्रयत्न होत असतात. असेच नवजीवन आता काही बचावकर्त्यांनी एकत्र येऊन एका फुलपाखराला दिले. त्यांनी फुलपाखराचे तुटलेले पंख जोडून त्याला पुन्हा उडण्यास मदत केली. या संपूर्ण प्रत्यारोपणाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे.
लॉन्ग आयलंड येथील स्वीटब्रीयर नेचर सेंटरच्या बचावकर्त्यांनी एका जखमी मोनार्क फुलपाखराच्या तुटलेल्या पंखाच्या जागी नवीन पंख लावून त्याचे ‘विंग ट्रान्सप्लांट’ केले, ज्यामुळे ते पुन्हा उडू लागले. या खास क्षणाचा व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे आणि तो लोकांच्या मनाला स्पर्श करत आहे. हे फुलपाखरू आपल्या तुटलेल्या पंखामुळे उडू शकत नव्हते आणि कदाचित ते जिवंतही राहिले नसते. तेव्हा बचावकर्त्यांनी एका मृत फुलपाखराच्या पंखाचा वापर करून जखमी फुलपाखराचे पंख जोडण्याचा प्रयत्न केला.
केंद्राने सांगितले की, ‘आम्ही एका मृत फुलपाखराच्या पंखाचा तुकडा काळजीपूर्वक त्याच्या तुटलेल्या पंखाच्या भागावर जुळवला आणि हळूहळू त्याची दुरुस्ती केली. याचा परिणाम असा झाला की, हे फुलपाखरू बदललेल्या पंखासह उडू लागले व त्याचा हा पंख जोडलेला आहे हे पाहिल्यावर कोणाला कळलेही नाही.’ विंग ट्रान्सप्लांट पूर्ण झाल्यावर फुलपाखराने जेव्हा आपले पंख पसरून आकाश भरारी घेतली, तेव्हा तिथे उपस्थित असलेले सर्व लोक भावुक झाले. या छोट्या जीवाला आपले आयुष्य जगण्याची दुसरी संधी मिळाली होती.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर लाखो वेळा पाहिला गेला आहे. लोक बचावकर्त्यांच्या मेहनत, दयाळूपणा आणि विचारांची जोरदार प्रशंसा करत आहेत. एका यूजरने लिहिले, ‘तुम्ही सर्वजण खरोखरच सर्वोत्कृष्ट माणूस आहात.’ दुसर्याने म्हटले, ‘मला विश्वास बसत नाही की हे खरोखर शक्य आहे! पंख चिकटवले तर फुलपाखरू उडू शकणार नाही असे मला वाटले होते, पण हे तर खरोखरच आश्चर्यकारक आहे!’