Secret to Longevity | फुलपाखरांच्या आयुष्यातून उघड झाले दीर्घायुष्याचे रंजक रहस्य

Secret to Longevity |
Butterfly Life Cycle | फुलपाखरांच्या आयुष्यातून उघड झाले दीर्घायुष्याचे रंजक रहस्य
Published on
Updated on

लंडन : गेल्या काही काळापासून दीर्घायुष्याविषयीच्या चर्चांमध्ये अमेरिकन अब्जाधीश ब्रायन जॉन्सन हे नाव सातत्याने समोर येत आहे. वयाच्या ४८ व्या वर्षी अमरत्व किंवा तरुणपण टिकवून ठेवण्यासाठी तो अत्यंत महागडे आणि तंत्रज्ञानावर आधारित ‘बायोहॅकिंग'चे प्रयोग करत आहे. मात्र, विज्ञानाला आता निसर्गातच दीर्घायुष्याची आणि निरोगी वृद्धत्वाची एक सोपी आणि नैसर्गिक गुरुकिल्ली सापडली आहे. 'नेचर कम्युनिकेशन्स'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, शास्त्रज्ञांनी फुलपाखरांच्या 'हेलिकोनियस' या विशिष्ट प्रजातीकडून दीर्घायुष्याचे रहस्य शोधले आहे.

सामान्यतः फुलपाखरांचे आयुष्य केवळ काही आठवड्यांचेच असते. परंतु, 'हेलिकोनियस' किंवा ‘लाँगविंग' नावाच्या उष्णकटिबंधीय फुलपाखरांनी हा नियम मोडीत काढला आहे. ही फुलपाखरे एक वर्षापर्यंत जिवंत राहू शकतात. युनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टलने केलेल्या या संशोधनात दोन जवळच्या प्रजातींच्या आयुर्मानात २५ पटींचा फरक आढळला. 'हेलिकोनियस हेविट्सोनी' हे फुलपाखरू ३४८ दिवस जगले, तर त्याच्याशीच साधर्म्य असणारी 'डिओन जुनो' ही प्रजाती केवळ १४ दिवस जगली.

दीर्घायुष्याचे नेमके रहस्य काय?

परागकणांचा आहार यावर शास्‍त्रज्ञांनी संशोधन केले. इतर सर्व फुलपाखरे केवळ फुलांमधील गोड रस पितात, त्‍यात फक्त साखर असते. मात्र, हेलिकोनियस फुलपाखरे ‘परागकण' खातात. जिभेने परागकणांमध्ये लाळ आणि एन्झाईम्स मिसळून त्यातील प्रथिने, अमिनो ॲसिड आणि जीवनसत्त्वे शोषून घेतात. शास्त्रज्ञांनी त्यांच्या पंखांची ताकद मोजण्यासाठी ‘पुलिनेटर’ नावाचे उपकरण तयार केले. यात असे दिसले की, वय वाढले तरी या फुलपाखरांच्या उडण्याच्या क्षमतेत आणि पंखांच्या ताकदीत फारशी घट झाली नाही. केवळ चांगला आहारच नाही, तर त्या पोषक तत्त्वांचा शरीरासाठी योग्य वापर करून वृद्धत्वाचा वेग कसा मंद करायचा, ही उत्क्रांतीची विशेष जैविक कला या फुलपाखरांच्या शरीरात विकसित झाली आहे. त्यांच्यामधील सेल्युलर आणि चयापचय प्रक्रियांचा अभ्यास केल्यास भविष्यात मानवालाही दीर्घकाळ निरोगी आणि चपळ राहण्यासाठी नवीन मार्ग सापडू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news