

लंडन : गेल्या 15 वर्षांपासून अटलांटिक महासागरात एक प्रचंड तपकिरी समुद्री शेवाळाचा (सीविड-सरगसम) पट्टा वाढत आहे. अवकाशातून उपग्रहांनी टिपलेल्या चित्रांमध्ये तो 8,850 कि.मी. लांबीच्या तपकिरी रिबनसारखा दिसत असून तो आफ्रिकेच्या पश्चिम किनार्यापासून थेट मेक्सिकोच्या आखातापर्यंत पसरला आहे.
या प्रचंड शेवाळराशीला ‘ग्रेट अटलांटिक सारगसम बेल्ट’ असे नाव देण्यात आले आहे. या समुद्री शेवाळाचे वजन तब्बल 37.5 दशलक्ष टन आहे. 2011 मध्ये याची नोेंद घेण्यास शास्त्रज्ञांनी सुरुवात केली. या शेवाळाचा आकार आता अमेरिका खंडाच्या रुंदीपेक्षा दुप्पट झाला आहे. पोषणतत्त्व कमी असलेल्या समुद्राच्या भागात हे शेवाळ आढळते. मात्र आता ते नायट्रोजन आणि फॉस्फरसने समृद्ध अशा दूषित पाण्यात वेगाने वाढत आहे.
शेतीमधील रासायनिक खतांचा अतिरिक्त वापर, सांडपाणी आणि हवेतून येणारे पोषक घटक हे या शेवाळ वाढीला कारणीभूत आहेत. विशेषतः अमेझॉन नदीतून येणार्या मोठ्या प्रमाणात पोषक घटकांचा यात मोठा वाटा आहे. फ्लोरिडा अटलांटिक युनिव्हर्सिटीच्या एका वैज्ञानिक अभ्यासानुसार, 1980 ते 2020 या काळात सरगसमच्या पेशींमधील नायट्रोजनचे प्रमाण 55 टक्क्यांनी वाढले आहे. गल्फ स्ट्रीम सारख्या नैसर्गिक सागरी प्रवाहांद्वारे हे शेवाळ एका खंडातून दुसर्या खंडात पसरत आहे. या मोठ्या प्रमाणावर शेवाळ वाढीमुळे अटलांटिक महासागर आणि मेक्सिकोच्या आखातातील पर्यावरणावर आणि अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होण्याची भीती शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे.