

नवी दिल्ली : निरोगी आयुष्यासाठी आहारात पोषक तत्त्वांनी युक्त पदार्थांचा समावेश करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. जेव्हा पौष्टिक आहाराचा विषय येतो, तेव्हा फिटनेसप्रेमींच्या यादीत ‘ब्रोकोली’ या भाजीचे नाव अग्रस्थानी असते. डॉक्टर आणि आहारतज्ज्ञांपासून ते फिटनेस इन्फ्लुएन्सरपर्यंत सर्वांनीच ब्रोकोलीला ‘सुपरफूड’चा दर्जा दिला आहे. अनेक गंभीर आजार दूर ठेवण्यासाठी ब्रोकोली गुणकारी ठरते, असे तज्ज्ञ सांगतात.
ब्रोकोलीमध्ये ‘सल्फोराफेन’ नावाचे एक शक्तिशाली संयुग असते, जे कर्करोगाच्या पेशींची वाढ रोखण्यास मदत करू शकते. जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या एका संशोधनानुसार, सल्फोराफेन शरीरातील कर्करोग निर्माण करणार्या एन्झाईमला निष्क्रिय करते आणि डीएनएचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते. विशेषतः, फुफ्फुस, स्तन, प्रोस्टेट आणि कोलन (मोठ्या आतड्याचा) कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी ब्रोकोली प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. ब्रोकोली हृदयाच्या आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहे. यामध्ये असलेले पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर हृदय निरोगी ठेवण्यास मदत करतात.
अमेरिकेच्या ‘नॅशनल हार्ट, लंग्स अँड ब्लड इन्स्टिट्यूट’च्या मते, ब्रोकोलीसारख्या उच्च फायबरयुक्त आहाराने हृदयरोगाचा धोका 20 ते 25 टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतो. तसेच, सल्फोराफेन आणि फ्लावोनॉयडस्सारखे अँटीऑक्सिडंट घटक धमन्यांमधील सूज आणि ऑक्सिडेटिव्ह नुकसान रोखतात, ज्यामुळे ‘एथेरोस्क्लेरोसिस’ (धमन्यांमध्ये प्लाक जमा होणे) होण्याचा धोका कमी होतो. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, ब्रोकोली बहुतेक लोकांसाठी सुरक्षित आणि आरोग्यदायी असली, तरी काही विशिष्ट परिस्थितींमध्ये तिचे सेवन करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
ब्रोकोलीमध्ये फायबर आणि ‘रॅफिनोज’ (एक प्रकारची साखर) यांचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे काही लोकांमध्ये गॅस, पोट फुगणे किंवा पचनाच्या इतर समस्या निर्माण होऊ शकतात. ज्या लोकांना थायरॉईडची समस्या आहे, त्यांनी ब्रोकोलीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. कारण, ब्रोकोलीतील काही घटक थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात अडथळा आणू शकतात. काही प्रकरणांमध्ये ब्रोकोली विशिष्ट औषधांच्या शोषणावर परिणाम करू शकते. त्यामुळे नियमित औषधोपचार घेत असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.