लंडन : ब्रिटनमधील एका दूरसंचार कंपनीने ऑनलाईन स्कॅमर्सचा बीमोड करण्यासाठी नवा चॅटपॉट साकारला असून डेजी नामक एआय संचलित चॅटबॉट तयार केले आहे. डेजी चॅटबॉट अशा ऑनलाईन स्कॅमर्सना तब्बल 40 मिनिटांपर्यंत बोलण्यात गुंग ठेवेल आणि या कालावधीत कोणताही गैरप्रकार टाळण्यासाठी पुरेसा असेल, असा या कंपनीचा दावा आहे. ब्रिटिश कंपनी ओ-2 चे ब्रेन चाईल्ड असणारे डेजी हे सर्वसाधारण चॅटबॉट नाही. उलटपक्षी, ते विकसित एआय असून यात रियल टाईममध्ये मनुष्याप्रमाणे बोलता यावे, अशी त्याची रचना केली गेली आहे.
हा चॅटबॉट स्कॅमर्सशी एखाद्या मनुष्याप्रमाणेच संवाद साधतो, त्यांचे ऐकून घेतो आणि जो संवाद होईल, त्यावर रितसर उत्तर देखील देतो. यामुळे स्कॅमर्सची समजूत अशी होते की, तो एखाद्या ज्येष्ठ महिलेशीच बोलत आहे, पण प्रत्यक्षात ते एक चॅटबॉट असते. युट्यूबचे प्रख्यात स्कॅमबेटर जिम ब्राऊजिंगने डेजीला अधिक विश्वासार्ह बनवण्यासाठी त्याला प्रभावी रणनीतींसह प्रशिक्षित केले आहे. एआय डेजीची यामुळे स्कॅमर्सना 40 मिनिटे बोलण्यात गुंगवून ठेवण्याची ताकद आहे.
संवादासाठी या चॅटबॉटकडे अनेक टॉपिक असतात. स्कॅमर्सशी बोलताना काल्पनिक प्रकल्प किंवा कुटुंबातील बनावट ड्रामा असे विषयही निवडण्याची हातोटी आहे. आजारापासून कसा बचाव करावा, याच्या युक्ती आहेत आणि हे कोणाला ना कोणाला ऐकायचेच असते, असे या कंपनीचे म्हणणे आहे. डेजी चॅटबॉट याशिवाय स्कॅमर्सचा निपटारा कसा करायचा, याबाबत युझर्सना मार्गदर्शन करेल. शिवाय, धोके कसे टाळावेत, याबाबतही वेळोवेळी सविस्तर विवेचन करेल, असे या कंपनीने पुढे म्हटले आहे.