Dangerous Tradition | लग्नातील प्रथेच्या नावाखाली करवलीला चादरीतून हवेत उडवले!

मणक्याचे हाड मोडल्याने आले कायमचे अपंगत्व : चीनमधील घटना
Dangerous Tradition |
Dangerous Tradition | लग्नातील प्रथेच्या नावाखाली करवलीला चादरीतून हवेत उडवले!
Published on
Updated on

बीजिंग : लग्नाच्या प्रथेच्या नावाखाली अनेक ठिकाणी भन्नाट प्रकार केले जात असतात. आपल्याकडेही ‘बूट चोरणे’ वगैरे फालतू गोष्टी हिंदी चित्रपट पाहून केल्या जाऊ लागल्या आहेत. त्यावरून अनेक ठिकाणी भांडण-तंटेही होतात. चीनमध्ये तर लग्नाच्या प्रथेच्या नावाखाली करवलीला चक्क चादरीत झोपवून हवेत फेकण्यात आल्याची घटना घडली आहे. यामुळे तिच्या पाठीला गंभीर दुखापत होऊन तिला कायमचे अपंगत्व आले!

‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या वृत्तानुसार, ही घटना ऑक्टोबर २०२३ मध्ये घडली. यात ‘झांग’ नावाची तरुणी, जी एका मैत्रिणीच्या लग्नात 'ब्राइडस्‌मेड' होती, ती ‘हुन्नाओ’ नावाच्या पारंपरिक विधीची बळी ठरली. मस्करीच्या नावाखाली करण्यात आलेल्या या घटनेमुळे तरुणीला प्रचंड मोठा मानसिक धक्का बसला आहे. कोर्टाने याप्रकरणी वर, वधू आणि काही सदस्यांना जबाबदार धरलं आहे. कोर्टातील रेकॉर्डनुसार, झांग हिला एका खोलीत सुमारे १० पुरुषांसोबत एकटे सोडण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने नवरदेवाचे मित्र होते. सर्वात आधी तिला एका कपाटातून ओढून बाहेर काढण्यात आले. त्यानंतर पलंगावर फेकण्यात आले. नंतर चादरीच्या साहाय्याने हवेत उडवण्यात आले. पहिल्यांदा त्यांनी तिला झेलले; परंतु दुसऱ्यांदा हवेत उडवताना ती जमिनीवर पडली.

यामध्ये तिच्या पाठीच्या मणक्याच्या हाडाला गंभीर दुखापत झाली. झांगला १८ दिवसांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ऑगस्ट २०२४ मधील वैद्यकीय अहवालांनुसार, दुखापतीचे वर्गीकरण 'ग्रेड ९' चे अपंगत्व असे करण्यात आले. तिने वैद्यकीय खर्च आणि मानसिक त्रासासाठी २,७०,००० युआन (सुमारे ३८ लाख रुपये) इतकी नुकसानभरपाई मिळावी यासाठी नवरी, नवरदेव आणि या घटनेत सहभागी असलेल्या इतर नऊ जणांविरुद्ध खटला दाखल केला. अखेरीस कोर्टाने तिला सुमारे २,३०,००० युआन (सुमारे ३२ लाख रुपये) देण्याचा आदेश दिला. हुन्नाओ ही एक प्राचीन चिनी प्रथा आहे, जी मूळतः दुष्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी आणि नवविवाहित जोडपे व पाहुण्यांमधील संकोच दूर करण्यासाठी होती. तथापि, गेल्या काही वर्षांपासून वधू, वर आणि लग्नसमारंभातील सदस्यांचा समावेश असलेल्या या विधीचं रूपांतर धोकादायक मस्करीत होत असल्याने टीका होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news