फिंगरप्रिंटप्रमाणे श्वासोच्छ्वासानेही पटू शकते एखाद्याची ओळख!

breathing-pattern-can-identify-person-like-fingerprint
फिंगरप्रिंटप्रमाणे श्वासोच्छ्वासानेही पटू शकते एखाद्याची ओळख!Pudhari File Photo
Published on
Updated on

तेल अवीव : श्वासोच्छ्वास हे जरी रोजचं आणि सरळ वाटणार्‍या क्रियाप्रक्रियेप्रमाणे दिसत असले, तरी माणसाचा श्वास हा इतका वैशिष्ट्यपूर्ण असतो की, त्यावरून व्यक्तीची ओळख पटू शकते, असा निष्कर्ष एका नव्या वैज्ञानिक अभ्यासातून समोर आला आहे. हा अभ्यास ‘करंट बायोलॉजी’ या वैज्ञानिक नियतकालिकात गुरुवारी (12 जून) प्रकाशित झाला. संशोधकांनी तयार केलेल्या एका विशेष अल्गोरिदममुळे, वेगवेगळ्या व्यक्तींचा ‘श्वासाचा ठसा’ (respiratory fingerprint) ओळखण्यात जवळपास 97 टक्के अचूकता साधली गेली.

हा श्वास घेण्याचा नमुना इतका विशिष्ट असतो की, तो व्यक्तीची ओळख सांगतोच; शिवाय त्याच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्याविषयीही महत्त्वाच्या सूचना देऊ शकतो, असं संशोधकांचं म्हणणं आहे. श्वासोच्छ्वास ही क्रिया अनेक मेंदूच्या विभागांद्वारे नियंत्रित केली जाते. त्यामुळेच संशोधकांनी असा तर्क मांडला की, ‘प्रत्येक व्यक्तीचा मेंदू जसा वेगळा असतो, तसाच श्वास घेण्याचा नमुनासुद्धा विशिष्ट असू शकतो,’ असं या अभ्यासाच्या प्रमुख संशोधिका टिम्ना सोरोका यांनी सांगितलं. त्या इस्रायलमधील वाईझमॅन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स येथे पीएच.डी. करत आहेत.

या सिद्धांताची चाचणी करण्यासाठी, संशोधकांनी 97 स्वयंसेवकांची निवड केली आणि त्यांच्या नाकाखालील ट्यूबद्वारे श्वासोच्छ्वास मोजणारे उपकरण 24 तासांसाठी लावले. सहभागी व्यक्तींनी झोपणे, काम करणे, फिरणे असे नियमित व्यवहार करत असतानाच त्यांचा श्वास डेटा नोंदवण्यात आला. यानंतर, संशोधकांनी एक विशेष सॉफ्टवेअर वापरून या श्वासोच्छ्वासात असलेले अनेक लपलेले नमुने आणि वेळेचे भेद (जसे की, श्वास घेण्याआधी किंवा घेतल्यानंतरचा थोडासा थांबा) शोधून काढले. नोम सोबेल, या अभ्यासाचे सहलेखक आणि न्यूरोबायोलॉजीचे प्राध्यापक, यांनी सांगितले की, हे अगदी सूक्ष्म फरकही व्यक्तिविशिष्ट असतात.

प्रत्येक 24 तासांच्या रेकॉर्डिंगचे त्यांनी 5 मिनिटांच्या भागांमध्ये विभाजन करून त्या प्रत्येक भागातले वैशिष्ट्यांचे विश्लेषण केले. मशिन लर्निंग तंत्रज्ञानाचा वापर करून, त्यांनी या ‘श्वसन नकाशां’चा अभ्यास केला आणि असं आढळलं की, प्रत्येक व्यक्तीचा हा नमुना इतरांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे. यानंतर 42 सहभागी व्यक्तींवर 2 वर्षांच्या आत कोणत्याही एका दिवशी दुसर्‍यांदा त्याच चाचणी घेण्यात आली आणि त्या वेळीही त्यांच्या श्वास नमुन्यात फारसा फरक दिसला नाही, तो तितकाच विशिष्ट आणि त्यांच्या आधीच्या नमुन्याशी जुळणारा होता. या डेटावर आधारित मशिन लर्निंग अल्गोरिदमची चाचणी घेतली असता, फक्त श्वासाच्या नमुन्यावरून व्यक्ती ओळखण्याची अचूकता 96.8 टक्के होती. या संशोधनामुळे भविष्यात वैयक्तिक ओळख, आरोग्याचे निदान आणि बायोमेट्रिक सुरक्षा तंत्रज्ञानात एक नवे युग सुरू होण्याची शक्यता आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news