

रिओ डी जानेरिओ ः बाझीलमधील ‘सेराडो’ हा सवाना प्रकारचा गवताळ प्रदेश केवळ जैवविविधतेसाठीच नाही, तर जागतिक पर्यावरणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचे एका ताज्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ‘न्यू फायटोलॉजिस्ट’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या शोधनिबंधानुसार, सेराडोमधील पाणथळ जागांमध्ये ॲमेझॉनच्या पर्जन्यवनांतील वनस्पतींच्या तुलनेत तब्बल 6 पट अधिक कार्बन साठवण्याची क्षमता आहे.
सेराडोचा विस्तार बाझीलच्या एकूण भूभागाच्या सुमारे 26 टक्के आहे. येथे वनस्पतींच्या 12,000 हून अधिक प्रजाती आणि वैविध्यपूर्ण प्राणी आढळतात. विशेष म्हणजे, बाझीलमधील ॲमेझॉनसह दोन-तृतीयांश प्रमुख नद्यांचे उगमस्थान याच प्रदेशातील भूगर्भातील पाण्यावर अवलंबून असलेल्या पाणथळ जागांमध्ये आहे. त्यामुळे या प्रदेशाचे रक्षण करणे पाणी सुरक्षेच्या दृष्टीनेही अनिवार्य आहे. संशोधन पथकाच्या प्रमुख आणि परिस्थितिकी तज्ज्ञ लरिसा वेरोना यांनी सांगितले की, ‘सेराडोमधील या पाणथळ जमिनी कार्बन जमा करण्यासाठी अमेरिकेतील सर्वात महत्त्वाच्या परिसंस्थांपैकी एक आहेत. मात्र, हा कार्बन सध्या धोक्यात आहे.’ शेतीसाठी होणारा जमिनीचा वापर, हवामान बदल आणि इतर मानवी हस्तक्षेपामुळे या ओल्या जमिनीतील कार्बन वातावरणात उत्सर्जित होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वीच्या अभ्यासांमध्ये संशोधक केवळ एक मीटर खोलीपर्यंतच तपासणी करत असत. मात्र, नवीन संशोधनात संशोधकांनी सात वेगवेगळ्या ठिकाणांहून जमिनीच्या खालचे अनेक मीटर लांब ‘सॉईल कोअर’ काढून तपासले. ॲमी झेन (सह-लेखिका) यांनी सांगितले, ‘वरवर न दिसणाऱ्या या जमिनींच्या खालच्या पाण्याचे महत्त्व आतापर्यंत दुर्लक्षित राहिले होते.’ राफेल ऑलिव्हेरा (सह-लेखक) म्हणाले, ‘या परिसंस्थांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे बाझीलच्या राष्ट्रीय कार्बन हिशेबात त्यांचा समावेश केला गेला नव्हता. विज्ञानाच्या पुराव्याशिवाय या जमिनी नष्ट झाल्यावर किती कार्बन बाहेर पडतो, याचा अंदाज लावणे कठीण होते.’