Brain's Fear Center | मानवी मेंदूतील ‘भीतीचे केंद्र’ चक्क आठवणी साठवणारे ‘सेव्ह बटण’

शास्त्रज्ञांच्या नव्या संशोधनात धक्कादायक खुलासा!
Brain's Fear Center |
Brain's Fear Center | मानवी मेंदूतील ‘भीतीचे केंद्र’ चक्क आठवणी साठवणारे ‘सेव्ह बटण’
Published on: 
Updated on: 

लॉस एंजेलिस : मानवी मेंदूतील भीती आणि राग यांसारख्या भावनांवर नियंत्रण ठेवणारा ‘अमिग्डाला’ हा अक्रोडाच्या आकाराचा भाग चक्क आपल्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी ‘सेव्ह बटण’ म्हणूनही काम करतो, असा महत्त्वपूर्ण खुलासा शास्त्रज्ञांनी केला आहे. लॉस एंजेलिसमधील ‘सीडर्स-सिनाई हेल्थ सायन्सेस युनिव्हर्सिटी’च्या न्यूरोसायंटिस्ट जियायांग शियाओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेल्या संशोधनातून ही नवी माहिती समोर आली असून, हा शोधनिबंध ‘नेचर न्यूरोसायन्स’ या प्रतिष्ठित जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे.

आपण दैनंदिन जीवनात जे काही अनुभवतो, त्यातील बहुतांश गोष्टी विसरून जातो आणि केवळ मोजकीच माहिती दीर्घकाळ लक्षात राहते. ही निवड नेमकी कशी होते, या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी हे संशोधन करण्यात आले. मेंदूच्या खोलवर असलेल्या अमिग्डाला भागातील पेशींचा (न्यूरॉन्स) अभ्यास करणे अत्यंत कठीण असते. यासाठी संशोधकांनी अपस्माराचा (एपिलेप्सी) त्रास असलेल्या ९० हून अधिक रुग्णांच्या मेंदूत उपचारासाठी आधीच बसवलेल्या सूक्ष्म इलेक्ट्रोडस्‌ची मदत घेतली. या प्रयोगात रुग्णांना अन्नपदार्थ, प्राणी यांसारख्या पाच विविध श्रेणींतील रोजच्या वापरातील वस्तूंची चित्रे दाखवण्यात आली. त्यानंतर १० ते ३० मिनिटांनी त्यांना कोणती चित्रे आठवतात, याची चाचणी घेण्यात आली.

या चाचणीत असे दिसून आले की, जेव्हा रुग्ण एखादे चित्र पाहत होते, तेव्हा त्यांच्या अमिग्डालामधील विशिष्ट न्यूरॉन्स सक्रिय झाले आणि नेमकी तीच चित्रे त्यांना नंतर अचूकपणे आठवली. संशोधकांच्या मते, ही प्रक्रिया दोन टप्प्यांत घडते; सर्वप्रथम अमिग्डाला त्या चित्राचे वर्गीकरण करतो आणि त्यानंतर पहिल्यांदा ते चित्र पाहताना न्यूरॉन्सनी दिलेला प्रतिसाद किती तीव्र होता, यावरून ती आठवण दीर्घकाळ साठवायची की नाही हे ठरवले जाते. आतापर्यंत मेंदूतील ‘हिप्पोकॅम्पस’ हा भागच प्रामुख्याने स्मृती साठवण्याशी जोडलेला मानला जात होता. मात्र, या संशोधनात हिप्पोकॅम्पसपेक्षा अमिग्डालाचा स्मृती निर्मितीशी असलेला संबंध अधिक स्पष्ट आणि वेगवान असल्याचे आढळले. सध्या स्मृतिभ्रंशासारख्या (मेमरी डिसऑर्डर्स) विकारांवर ठोस उपचार उपलब्ध नाहीत. या नव्या संशोधनामुळे भविष्यात अमिग्डालातील पेशींना चालना देऊन स्मरणशक्ती सुधारण्यासाठी प्रभावी उपचार पद्धती विकसित करणे शक्य होईल, असा विश्वास शास्त्रज्ञांनी व्यक्त केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.