

न्यूयॉर्क : रक्त आणि सेरेब्रोस्पाईनल फ्लुईड (मेरुदंडातील द्रव) यामध्ये असलेल्या प्रोटिन्सच्या अभ्यासातून मेंदूच्या विविध आजारांचे निदान करण्यासाठी सुधारित रक्त चाचण्या शास्त्रज्ञांनी शोधून काढल्या आहेत. या संशोधनामुळे रोगाचा धोका आणि त्याची सुरुवात होण्यापूर्वीच धोक्याचा इशारा मिळवणे शक्य होईल, असे संशोधकांनी म्हटले आहे. ‘नेचर मेडिसिन’ आणि ‘नेचर एजिंग’ या प्रतिष्ठित नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झालेल्या अनेक शोधनिबंधांमधून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
या संशोधनानुसार, मानवी शरीरातील रक्त आणि मेरुदंडातील द्रवामधून वाहणार्या प्रोटिन्समध्ये मेंदू आणि मज्जासंस्थेच्या आजारांची एक विशिष्ट ओळख (प्रोटिन सिंग्नेचर) लपलेली असते. प्रत्येक आजारासाठी या प्रोटिन्सची रचना आणि प्रमाण वेगवेगळे असते. या ‘सिग्नेचर’च्या आधारे अल्झायमर, पार्किन्सन, डिमेन्शियाचे काही प्रकार, स्नायूंचा क्षय (मायोट्रॉफिक लॅटरल स्क्लेरोसिस) आजारांमध्ये फरक करणे शक्य होऊ शकते. सध्या मेंदूच्या अनेक आजारांची लक्षणे सारखीच असल्यामुळे त्यांचे अचूक निदान करणे आव्हानात्मक असते. अनेकदा निदान होईपर्यंत बराच उशीर झालेला असतो. मात्र, या नवीन संशोधनामुळे केवळ एका रक्त तपासणीद्वारे रोगाचे लवकर आणि अचूक निदान करणे शक्य होऊ शकते. लवकर निदान झाल्यामुळे रुग्णांवर वेळेवर उपचार सुरू करता येतील, ज्यामुळे रोगाची वाढ मंदावू शकते आणि रुग्णांचे जीवनमान सुधारण्यास मोठी मदत मिळू शकते. हे संशोधन भविष्यात मेंदूच्या आजारांवरील उपचारांमध्ये क्रांतिकारक ठरू शकते, असा विश्वास तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.