

नवी दिल्ली : मानवी मेंदूच्या वाढीविषयी दीर्घकाळ प्रचलित असलेल्या समजुतींना छेद देणारा नवा वैज्ञानिक शोध समोर आला आहे. स्वीडनमधील करोलिंस्का इन्स्टिट्यूटच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे आढळले आहे की, मानवी मेंदूच्या पेशी - विशेषतः स्मरणशक्तीसाठी महत्त्वाच्या असलेल्या हिप्पोकॅम्पस भागात वृद्धापकाळातही तयार होत राहतात.
या अभ्यासासाठी शून्य ते 78 वयोगटांतील व्यक्तींच्या मेंदूच्या ऊतींचा सखोल अभ्यास करण्यात आला. संशोधकांनी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूमधील नव्या पेशींच्या निर्मितीची स्पष्ट चिन्हे शोधली. 70 ते 80 वयोगटांतील व्यक्तींमध्येही मेंदूच्या पेशी तयार होत असल्याचे आढळले. या प्रक्रियेला ‘न्यूरोजेनेसिस’ असे म्हणतात, आणि ती आयुष्यभर सुरू राहते, जरी वय वाढल्याने तिचा वेग कमी होतो.
या शोधामुळे मेंदूच्या लवचिकतेविषयी नवे द़ृष्टिकोन समोर आले आहेत. स्मरणशक्ती, शिकण्याची क्षमता आणि भावनांचे नियंत्रण यासाठी हिप्पोकॅम्पस भाग महत्त्वाचा आहे. त्यामुळे हा शोध अल्झायमर, डिप्रेशन आणि वयोमानानुसार होणार्या मानसिक आजारांच्या उपचारांसाठी नवी दिशा देऊ शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. या संशोधनामुळे वृद्धापकाळातही मेंदूच्या आरोग्यासाठी नवी आशा निर्माण झाली आहे.