

ल्हासा : ब्रह्मपुत्रा नदीला जगातील सर्वाधिक उंचीवरून वाहणारी नदी म्हणून ओळखले जाते. चीनच्या ताब्यात असलेल्या तिबेटमध्ये ही नदी उगम पावते आणि भारत, बांगलादेश असा प्रवास करीत बंगालच्या उपसागराला मिळते. चीन व तिबेटमध्ये तिला ‘यारलुंग झांगबो’ या नावाने ओळखले जाते. या नदीच्या एका विशेषतः गुंतागुंतीच्या भागाचा एक लक्षवेधी उपग्रह फोटो समोर आला आहे. ही नदी दरवर्षी आपला आकार मोठ्या प्रमाणात बदलते आणि येत्या काही दशकांत हवामान बदलामुळे तिचा आकार अधिक अस्थिर होण्याची शक्यता आहे.
ब्रह्मपुत्रा नदीला खरे तर ‘ब्रह्मपुत्र’ असे पुल्लिंगी नाव आहे. ‘शोण’ प्रमाणेच ‘ब्रह्मपुत्र’ला नदी नव्हे तर ‘नद’ म्हणून ओळखले जाते. चीनमध्ये यारलुंग झांगबो नाव असलेली ही नदी सुमारे 1,250 मैल (2,000 किलोमीटर) लांबीची आहे, जी पूर्व तिबेटच्या पठारावरील एका हिमनदीतून उगम पावते आणि भारतात प्रवेश करते. ही तिबेटमधील सर्वात लांब नदी तसेच चीनमधील पाचवी सर्वात लांब नदी आहे. पृथ्वीवरील सर्वात उंचीवरील मोठी नदी म्हणून हिचा विक्रम आहे. नासाच्या अर्थ ऑब्झर्व्हेटरीनुसार, ही नदी समुद्रासपाटीपासून सरासरी 4,000 मीटर (13,000 फूट) उंचीवरून वाहते.
उपग्रहाने टिपलेला नदीचा हा भाग झानांग काऊंटीमध्ये आहे. यानंतर ही नदी जगातील सर्वात खोल भू-आधारित दरीतून आणि तिच्या नावाच्या यारलुंग त्सांगपो ग्रँड कॅनियनमधून वाहते. हा कॅनियन 6,000 मीटरपेक्षा (20,000 फूट) खोल आहे, जो अॅरिझोनाच्या ग्रँड कॅनियनपेक्षा तिप्पट खोल आहे. यारलुंग झांगबो नदी ‘वेण्यांसारख्या’ नदीचे उत्तम उदाहरण आहे. नॅशनल पार्क सर्व्हिसनुसार, या प्रकारच्या नदीत अनेक ‘धाग्यांसारखे प्रवाह’ असतात जे एकत्र येतात आणि वेगळे होतात, ज्यामुळे वेण्यांसारखा विशिष्ट नमुना तयार होतो. नदीच्या मध्यभागी असलेले वाळूचे ढिगारे सतत तयार होतात, नष्ट होतात आणि पुन्हा तयार होतात. या छायाचित्रातील भाग असा आहे जिथे नदीच्या संपूर्ण प्रवाहात सर्वात जास्त ‘वेणी’ तयार होतात, काही ठिकाणी 20 पर्यंत प्रवाह दिसतात.
टेक्सास विद्यापीठाचे भूगर्भशास्त्रज्ञ झोल्टान सिल्वेस्टर यांनी अर्थ ऑब्झर्व्हेटरीला सांगितले की, यारलुंग झांगबोमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात वेण्या तयार होण्याचे कारण म्हणजे हिमालयाच्या उतारावरून येणारा अति प्रमाणात गाळ. हा गाळ नदीत मिसळतो आणि जमिनीवर नवीन प्रवाह कोरण्यास मदत करतो. ते पुढे म्हणाले की, नदी इतका वारंवार आकार बदलते की तिच्या प्रवाहादरम्यान तयार होणार्या वाळूच्या ढिगार्यांवर कोणतीही वनस्पती पूर्णपणे वाढू शकत नाही. हवामान बदलामुळे नदीत पाण्याची पातळी आणि गाळाचे प्रमाण बदलू शकते, ज्यामुळे येत्या दशकांमध्ये ही ‘वेण्यांसारखी’ नदी आणखी अस्थिर आणि अनिश्चित होण्याची शक्यता आहे.