

हांगझोऊ : चीनमधील हांगझोऊ शहरातून एक संतापजनक प्रकार समोर आला असून, वर्कप्लेसवरील दबाव आणि कर्मचाऱ्यांवर लादल्या जाणाऱ्या जाचक नियमांमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर खळबळ उडाली आहे. एका फायनान्शियल कंपनीत सेल्सचे टार्गेट पूर्ण न केल्यामुळे मॅनेजरने महिला कर्मचाऱ्याला चक्क २०० उठाबशा मारण्याची शारीरिक शिक्षा दिली. या अमानुष शिक्षेमुळे तरुणीची प्रकृती गंभीर झाली आहे.
‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, ‘यांग’ आडनाव असलेली ही तरुणी आपल्या पहिल्याच नोकरीसाठी झेजियांग प्रांतातील हांगझोऊ शहरात आली होती. जून महिन्यात तिने एका लोन असिस्टन्स कंपनीत फायनान्शियल कन्सल्टंट म्हणून काम सुरू केले. मात्र, तिच्यावर दररोज २०० फोन कॉल करणे, किमान एक ग्राहक जोडणे आणि एका संभाव्य ग्राहकाला कंपनीसोबत जोडण्यास तयार करणे, असा प्रचंड दबाव टाकण्यात आला. २८ जुलै रोजी यांग टार्गेट पूर्ण करू शकली नाही. यामुळे मॅनेजर झांग याने तिच्यासमोर दोन पर्याय ठेवले. प्रत्येक अपूर्ण टार्गेटमागे ५० युआन (सुमारे ७०९ रुपये) दंड भरणे किंवा १०० उठक-बैठका मारणे.
आर्थिक अडचण असल्याने यांग हिने दंड भरण्याऐवजी उठाबशा किंवा उठक-बैठकांचा पर्याय निवडला. दोन टार्गेट चुकल्याने तिला २०० उठक-बैठका माराव्या लागल्या. तिने पुरावा म्हणून शिक्षेचा व्हिडीओ बनवून सुपरवायझरला पाठवला. शिक्षेनंतर यांगला प्रचंड वेदना होऊ लागल्या आणि चालताना पाय थरथरू लागले. घटनेच्या पाच दिवसांनंतर तिच्या लघवीचा रंग गडद झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या तपासणीत तिला ‘रॅब्डोमायोलिसिस’ (Rhabdomyolysis) हा स्नायूंचा अत्यंत गंभीर आजार झाल्याचे निष्पन्न झाले. अतिश्रम आणि स्नायूंचे अतोनात नुकसान झाल्यामुळे स्नायूंमधील घातक घटक रक्तात मिसळू लागतात, ज्यामुळे ‘किडनी फेल’ होऊन मृत्यूही ओढवू शकतो.
तिच्या शरीरातील ‘क्रिएटीन किनेज’ची पातळी १६,००० U/L वर पोहोचली होती, जी सामान्य प्रमाणापेक्षा कैक पटीने जास्त होती. या उपचारावर यांगचे सुमारे १,४०० युआन (सुमारे २० हजार रुपये) खर्च झाले. प्रकृतीच्या अस्वास्थ्यामुळे तिने ३० जुलै रोजी नोकरीचा राजीनामा दिला. तिने वैद्यकीय खर्चासह १५ हजार युआन (सुमारे २.१ लाख रुपये) भरपाईची मागणी केली. मात्र, मॅनेजरने ही मागणी फेटाळून लावत तिला न्यायालयात जाण्याचा सल्ला दिला. यानंतर यांग हिने हे प्रकरण एका टीव्ही शोच्या माध्यमातून समोर आणले आणि स्थानिक कामगार तपासणी विभागाकडे तक्रार नोंदवली. या घटनेनंतर चीनमध्ये कर्मचाऱ्यांच्या मानसिक आणि शारीरिक छळाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.