

चंदिगड ः वीस वर्षांपूर्वी म्हणजेच 2006 मध्ये हरियाणातील कुरुक्षेत्र जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली होती. त्यावेळी सगळ्या देशाचं लक्ष त्याच घटनेकडे होतं. ती घटना आज पुन्हा चर्चेत आली आहे. त्यावेळी खेळता खेळता केवळ पाच वर्षांचा असलेला प्रिन्स सिंग नावाचा मुलगा तब्बल 100 फूट खोल बोअरवेलमध्ये पडला होता. ही घटना घडताच संपूर्ण गावात आणि परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यावेळी प्रिन्सला वाचवण्यासाठी स्थानिक प्रशासन, पोलिस, बचाव पथक यांच्यासोबतच भारतीय लष्करालाही पाचारण करण्यात आले होते. तब्बल तीन दिवस सतत चाललेल्या मोठ्या बचाव अभियानानंतर अखेर प्रिन्सला जिवंत बाहेर काढण्यात यश मिळाले. या घटनेने संपूर्ण देशाचे लक्ष वेधले होते आणि तो ‘बोअरवेल प्रिन्स’ म्हणून ओळखला गेला.
अपघातातून तब्बल तीन दिवसांनी जिवंत बाहेर पडलेला प्रिन्स आता मोठा झाला असून तो सध्या 24 वर्षांचा आहे. प्रिन्स सध्या अंबाला येथे आयआयटीमध्ये शिक्षण घेत आहे. कुरुक्षेत्रचे खासदार नवीन जिंदाल यांच्यासोबतच्या त्याच्या भेटीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलो सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रिन्सशी जिंदाल यांनी संवाद साधला आणि त्याच्या तब्येतीची विचारपूस केली. लहानपणी मृत्यूच्या दारातून परत आलेल्या या मुलाचे आयुष्य आता पूर्णपणे बदलले आहे. तो स्वतःच्या करिअरवर लक्ष केंद्रित करत असून पुढे स्थिर भविष्य घडवण्याचा प्रयत्न करत आहे.
नवीन जिंदाल यांच्याशी झालेल्या भेटीत दोघांनीही जुन्या आठवणींना उजाळा दिला. जिंदाल यांनी सांगितले की, त्या काळात प्रिन्सला बोअरवेलमधून बाहेर काढल्यानंतर त्यांनी त्याला स्वतः खांद्यावर उचलले होते. आता तो तरुण आणि हेल्दी झाल्याचे पाहून त्यांनी आनंद व्यक्त केला. प्रिन्सनेही या संवादात आपला सध्याचा प्रवास सांगितला आणि तो आयटीआयमध्ये शिक्षण घेत असल्याचे स्पष्ट केले. सोशल मीडियावर या भेटीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून लोकांनीही या भावनिक भेटीवर प्रतिक्रिया दिल्या आहेत.