

नवी दिल्ली : बोर हे फळ आपल्याला रामायणकाळापासूनच माहिती आहे. शबरीने भक्तीभावाने रामरायाला दिलेली उष्टी बोरे रामायणाने अजरामर केलेली आहेत. बोर हे हिवाळ्यात मिळणारे लहान फळ आहे, पण त्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह आणि अँटिऑक्सिडंटस् भरपूर प्रमाणात असतात. बोरात व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते जे रोग प्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करते, असे आहारतज्ज्ञ सांगतात. हे फळ सर्दी, खोकला यांसारख्या आजारांपासून संरक्षण करते.
बोरामध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते जे पचन व्यवस्थित ठेवण्यास मदत करते. त्यामुळे बद्धकोष्ठता आणि अॅसिडिटीसारख्या समस्यांपासून आराम मिळतो. बोरामध्ये असलेले अँटीऑक्सिडंटस् त्वचा निरोगी ठेवण्यास मदत करतात. यामुळे त्वचा चमकदार होते आणि सुरकुत्या कमी होतात. बोरामध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित करण्यास आणि हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करते. बोरामध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस चांगले असते ज्यामुळे हाडे मजबूत होतात. बोरामध्ये दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे सूज कमी करण्यास मदत करतात. हे अॅनिमियापासून बचाव करण्यास देखील मदत करते. मधुमेहाचा त्रास असलेल्यांनी बोराचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे कारण त्यात नैसर्गिक साखरेचे प्रमाण थोडे जास्त असते. जर तुम्हाला बोरची ऍलर्जी असेल तर त्याचे सेवन करू नका, असे तज्ज्ञ सांगतात.