

सिडनी : ऑक्टोपस म्हटले की, आपल्या डोळ्यांसमोर एक हुशार आणि रंग बदलून शत्रूंना सहज चकवणारा जीव येतो; पण तुम्हाला माहीत आहे का की, काही ऑक्टोपस इतके धोकादायक असतात की, त्यांचा एक दंश माणसाचा जीव घेऊ शकतो? यापैकीच एक आहे ‘ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस’, जो आपल्या सुंदर निळ्या कड्यांसाठी ओळखला जातो; पण त्याचे सौंदर्य हे मृत्यूचेच दुसरे रूप आहे. त्याच्यामध्ये सायनाईडपेक्षा 1,200 पट अधिक जहाल विष असते.
या ऑक्टोपसला इतके जीवघेणे काय बनवते? उत्तर आहे - टेट्रोडोटॉक्सिन ( TTX). हे एक अत्यंत शक्तिशाली न्यूरोटॉक्सिन आहे, जे मानव आणि इतर सजीवांना पक्षाघातग्रस्त करू शकते. टेट्रोडोटॉक्सिन हे पफरफिशमुळे जास्त ओळखले जाते; चुकीच्या पद्धतीने तयार केलेला ‘फुगू’ मासा खाणार्यांचा मृत्यू होऊ शकतो. धक्कादायक बाब म्हणजे, टेट्रोडोटॉक्सिन हे सायनाइडपेक्षा 1,200 पट अधिक विषारी असून, त्यावर अद्याप कोणताही उतारा उपलब्ध नाही. ब्लू-रिंग्ड ऑक्टोपसच्या हॅपालोक्लिना या प्रजातीतील चारही ऑक्टोपसमध्ये टेट्रोडोटॉक्सिन आढळते, ज्यामुळे ते ऑक्टोपसच्या सर्वात विषारी प्रजाती ठरतात.
यामध्ये ग्रेटर ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस, सदर्न किंवा लेसर ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस, ब्लू-लाइन्ड ऑक्टोपस आणि कॉमन ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस यांचा समावेश आहे. चमकदार निळ्या वर्तुळांमुळे हे सागरी जीव दिसायला खूप सुंदर असले, तरी ते तितकेच धोकादायक आहेत. ‘स्मिथसोनियन म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’चे सहयोगी प्राणीशास्त्रज्ञ मायकल वेकिओनी यांच्या मते, ऑक्टोपससारख्या सर्व सागरी जीवांमध्ये (ऑक्टोपॉड) विष असते. परंतु, काही जीवांचे विष इतरांपेक्षा अधिक प्रभावी असते. ‘ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस कदाचित सर्वात विषारी आहे,’ असे त्यांनी सांगितले.
याचे एक कारण म्हणजे, तो उथळ पाण्यात राहतो, जिथे त्याला खाण्यासाठी अनेक शिकारी टपलेले असतात. त्याचे विष हे एक नैसर्गिक संरक्षण आहे. ‘हे विषारी स्राव ऑक्टोपॉडद्वारे तयार होणार्या नैसर्गिक विषांच्या विस्तृत श्रेणीपैकी एक आहेत,’ असेही वेकिओनी यांनी नमूद केले. मात्र, एक आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे ब्लू-रिंग्ड ऑक्टोपस स्वतः टेट्रोडोटॉक्सिन तयार करत नाहीत. ऑस्ट्रेलियन इन्स्टिट्यूट ऑफ मरीन सायन्सच्या अहवालानुसार, त्यांच्या लाळ ग्रंथींमध्ये असलेले सहजीवी जीवाणू हे विष तयार करतात.