New Glenn Rocket Explosion | ‘ब्लू ओरिजिन’च्या महाकाय ‘न्यू ग्लेन’ रॉकेटचा भीषण स्फोट

‘नासा’च्या चंद्र मोहिमेला मोठा धक्का
New Glenn Rocket Explosion |
New Glenn Rocket Explosion | ‘ब्लू ओरिजिन’च्या महाकाय ‘न्यू ग्लेन’ रॉकेटचा भीषण स्फोट
Published on
Updated on

केप कॅनव्हेरा (फ्लोरिडा): अ‍ॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेझोस यांच्या ‘ब्लू ओरिजिन’ कंपनीच्या ‘न्यू ग्लेन’ या महाकाय रॉकेटचा चाचणीदरम्यान भीषण स्फोट झाला आहे. या धक्कादायक घटनेमुळे चंद्रावर कायमस्वरूपी तळ ठोकण्याच्या अमेरिकन अंतराळ संस्था ‘नासा’च्या महत्त्वाकांक्षी योजनेसमोर आता अनिश्चिततेचे ढग जमा झाले आहेत.

321 फूट (98 मीटर) उंच असलेल्या या शक्तिशाली रॉकेटची गुरुवारी (28 मे) रात्री 9 च्या सुमारास फ्लोरिडा येथील ‘केप कॅनव्हेरा स्पेस फोर्स स्टेशन’वर ‘हॉटफायर चाचणी’ सुरू होती. चाचणी सुरू झाल्यानंतर अवघ्या काही सेकंदांतच रॉकेटचा एका महाकाय आगीच्या गोळ्यात रूपांतर होऊन मोठा स्फोट झाला. हा थरारक आणि भयानक स्फोट ‘स्पेसफ्लाइट नाऊ’च्या थेट प्रक्षेपणामध्ये कैद झाला आहे. हा स्फोट इतका भीषण होता की, गेल्या 50 वर्षांहून अधिक काळातील हा सर्वात शक्तिशाली रॉकेट स्फोटांपैकी एक मानला जात आहे, तसेच अमेरिकेच्या इतिहासातील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा रॉकेट स्फोट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या स्फोटाच्या तीव—तेमुळे रॉकेटच्या लॉन्चपॅडचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, आसपासचा परिसर आणि घरे हादरली. स्फोटानंतर रॉकेटचे अवशेष हवेत दूरवर उडाले. या दुर्घटनेमुळे संपूर्ण आकाश केशरी प्रकाशाने उजळून निघाले होते. हा प्रकाश घटनास्थळापासून तब्बल 175 मैल (280 किलोमीटर) दूर असलेल्या सारासोटा शहरातूनही दिसत होता. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या स्फोटामुळे जीवितहानी टळली असली, तरी चंद्रावर मानवाचा पहिला कायमस्वरूपी तळ उभारण्याच्या नासाच्या स्वप्नांना मात्र मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे, या दुर्घटनेच्या अवघ्या दोन दिवसांपूर्वी, म्हणजेच मंगळवारी (26 मे) नासाने आपली ही नवी मोहीम जाहीर केली होती.

या योजनेंतर्गत चालू वर्षात चंद्रावर सुरुवातीचे साहित्य पोहोचवण्यासाठी नासाने एकूण तीन मोहिमांचे कंत्राट ब्लू ओरिजिन कंपनीला दिले होते. याशिवाय मानवरहित लँडरसाठी 46.8 कोटी डॉलर्सचा निधीही मंजूर केला होता. यातील पहिल्या मोहिमेत ‘मून बेस 1’ हे साहित्य न्यू ग्लेन रॉकेटच्या साहाय्याने ब्लू ओरिजिनच्या ‘ब्लू मून मार्क 1 एंड्युरन्स’ या रोबोटिक लँडरद्वारे चंद्रावर पाठवले जाणार होते. तसेच, 2028 मध्ये चंद्रावर अंतराळवीर उतरवण्याच्या ‘आर्टेमिस 4’ मोहिमेसाठी मानवी लँडर बनवण्याच्या शर्यतीत जेफ बेझोस यांची ब्लू ओरिजिन आणि एलन मस्क यांची ‘स्पेसएक्स’ या दोन्ही कंपन्या एकमेकांसमोर उभ्या आहेत.

स्फोटाचे कारण अस्पष्ट

या भीषण स्फोटाचे नेमके कारण अजून समोर आलेले नाही. प्राथमिक अंदाजानुसार, रॉकेटच्या पहिल्या टप्प्यात हा बिघाड झाला. या भागात ‘इए-4’ प्रकारची सात लिक्विड मिथेन इंजिने बसवण्यात आलेली आहेत. जेफ बेझोस यांनी ‘एक्स’वर लिहिले, ‘सर्व कर्मचारी सुरक्षित आणि सुखरूप आहेत. स्फोटाचे मूळ कारण काय आहे हे इतक्या लवकर सांगणे कठीण आहे; परंतु आमचे पथक त्याचा शोध घेत आहे. आजचा दिवस अत्यंत कठीण होता; पण जे काही नुकसान झाले आहे ते आम्ही पुन्हा उभारू आणि लवकरच पुन्हा उड्डाण करू.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news