

वॉशिंग्टन : अंतराळातून पाहिल्यावर आपली पृथ्वी सुंदर, निळीशार दिसते. त्यामुळेच तिला अनेक संशोधक ‘ब्ल्यू मार्बल’ म्हणजेच ‘निळा संगमरवर’ असे म्हणत असत. आता ‘नासा’ आणि ‘फायरफ्लाय एरोस्पेस’ यांनी एकत्र येत चंद्राच्या दिशेनं एका मोहिमेअंतर्गत मोठं पाऊल टाकलं आहे. त्यांनी ‘ब्ल्यू घोस्ट लुनार लँडर’ मोहिमेची सुरुवात केली आहे. याच मोहिमेअंतर्गत पृथ्वीचे निळेशार द़ृश्य टिपण्यात आलं असून, लँडरनं यशस्वीरित्या एक व्हिडीओसुद्धा चित्रीत केला आहे.
या व्हिडीओमध्ये पृथ्वी हा एकमेव मानवी अस्तित्व आणि जीवसृष्टी असणारा ज्ञात ग्रह दिसत असून, या ग्रहाची झलक जणू एका निळ्याशार संगमरवरासारखी दिसत आहे. याच कारणानं नासानं या व्हिडीओमधील द़ृश्यांना ‘ब्ल्यू मार्बल’ असं संबोधलं आहे. यापूर्वी 1972 मध्ये अवकाशातून पृथ्वीचं असंच विलोभनीय रुप पाहायला मिळालं होतं. नासाच्याच ‘अपोलो 17’ मोहिमेदरम्यान मूळ स्वरूपातील ‘ब्ल्यू मार्बल’ची पहिली झलक अर्थात एक छायाचित्र टिपण्यात आलं होतं. 2002 मध्ये नासानं या फोटोचं अपडेटेड वर्जनही जारी केलं ज्याला ‘ब्ल्यू मार्बलः नेक्स्ट जनरेशन’ असं म्हटलं गेलं. दरम्यान, सध्या टिपलेली झलक ही ‘ब्ल्यू घोस्ट’चे श्रेय असून, या यानानं आपल्या प्रवासादरम्यान ही किमया केली आहे. ही झलक टिपण्यासाठी लँडरवर लावण्यात आलेल्या हाय टेक कॅमेरांचा वापर करण्यात आला होता. नासाच्या या मोहिमेविषयी सांगावं तर, ‘ब्ल्यू घोस्ट’ मोहिमेअंतर्गत नासा चंद्रावर उतरण्याची तयारी करत असून, या मोहिमेची आखणी ‘फायरफ्लाय एअरोस्पेस’ने नासाच्या कमर्शियल लुनार पेलोड सर्व्हिसेस’ (सीएलपीएस) कार्यक्रमाअंतर्गत केली आहे. चंद्राच्या पृष्ठापर्यंत नासाची 10 वैज्ञानिक उपकरणे पोहोचवणं हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे.