Organ Age Blood Test | रक्त चाचणीतून समजणार प्रत्येक अवयवाचे अचूक वय

भविष्यातील आजारांचा १० वर्षे आधीच लागणार अंदाज
Organ Age Blood Test |
Organ Age Blood Test | रक्त चाचणीतून समजणार प्रत्येक अवयवाचे अचूक वय
Published on
Updated on

नवी दिल्ली : आपल्या शरीराचे वय (क्रोनोलॉजिकल एज) वाढत असले, तरी आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव एकाच गतीने म्हातारा होत नाही. याच विज्ञानाचा आधार घेत वैज्ञानिकांनी आता रक्तावर आधारित एक नवीन 'इंडिकेटर' विकसित केला आहे. याच्या मदतीने शरीरातील विशिष्ट अवयवाचे नेमके 'जैविक वय' (बायोलॉजिकल एज) किती आहे, हे तर समजेलच; शिवाय त्या अवयवाला पुढील १० वर्षांत कोणता आजार होऊ शकतो, याचा अंदाजही आधीच लावता येणे शक्य होणार आहे. अमेरिकेतील प्रसिद्ध 'स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटी'च्या संशोधकांसह आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञांच्या एका गटाने हे महत्त्वपूर्ण संशोधन केले आहे.

काय आहे हे संशोधन आणि ते कसे काम करते?

माणसाचे बाह्य वय आणि त्याच्या शरीराच्या आत असणाऱ्या अवयवांचे कार्य प्रत्यक्षपणे कसे सुरू आहे, यात फरक असू शकतो. उदा. एखाद्या ३५ वर्षांच्या व्यक्तीचे हृदय किंवा मूत्रपिंड (किडनी) ५० वर्षांच्या व्यक्तीसारखे कार्य करत असू शकते. संशोधकांनी मानवी शरीरातील मेंदू, स्नायू, हृदय, फुफ्फुसे, धमन्या, यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, रोगप्रतिकारक शक्ती, आतडे, चरबी/मेद पेशी (फॅट) या ११ प्रमुख अवयव आणि संस्थांचा अभ्यास करून हा इंडिकेटर तयार केला आहे.

या संशोधनाचे फायदे

भविष्यातील आजारांची पूर्वसूचना: जर रक्ताच्या चाचणीत एखादा अवयव त्याच्या सामान्य वयापेक्षा वेगाने म्हातारा होत असल्याचे दिसून आले, तर पुढील १० वर्षांत त्या अवयवाशी संबंधित गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. हे आधीच समजल्यामुळे डॉक्टर वेळेवर प्रतिबंधात्मक उपचार सुरू करू शकतील.

वैयक्तिक उपचार पद्धती :

प्रत्येक रुग्णाच्या शरीरातील कोणत्या अवयवाला नेमकी कशाची गरज आहे, हे ओळखून अचूक उपचार करणे यामुळे सोपे होईल.

तज्ज्ञांचे मत :

‘हे संशोधन भविष्यात वैद्यकीय तपासण्यांची पद्धत पूर्णपणे बदलून टाकू शकते. केवळ एक साधी रक्ताची चाचणी करून आपण आपल्या हृदयविकाराचा, किडनी निकामी होण्याचा किंवा विस्मरणाचा धोका अनेक वर्षे आधीच ओळखू शकू आणि आयुष्यमान वाढवू शकू.’

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news