

नवी दिल्ली : गोंगाटाच्या ठिकाणी आपण बोलणे ऐकताना आपल्या पापण्यांची उघडझाप कमी होते का? जर होत असेल, तर याचा अर्थ असा असू शकतो की, आपला मेंदू ते संभाषण समजून घेण्यासाठी अधिक मेहनत घेत आहे. एका ताज्या अभ्यासानुसार, पापण्यांची हालचाल ही आपण ऐकताना घेत असलेल्या मानसिक श्रमाचे प्रतिबिंब असते. कॅनडातील कॉन्कॉर्डिया विद्यापीठातील संशोधकांनी हा अभ्यास केला आहे.
‘ट्रेंडस् इन हिअरिंग’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनातून असे दिसून आले आहे की, गोंगाटात ऐकणे जितके कठीण होते, तितकी पापण्यांची उघडझाप करण्याची क्रिया कमी होते. या अभ्यासासाठी दोन प्रयोग करण्यात आले. संशोधकांनी 50 प्रौढ व्यक्तींना एका ध्वनिरोधक खोलीत बसवले आणि त्यांच्या डोळ्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले. या सहभागी व्यक्तींना हेडफोनद्वारे छोटी-छोटी वाक्ये ऐकवण्यात आली, तर पार्श्वभूमीतील आवाज कधी शांत, तर कधी खूप गोंगाटाचा ठेवण्यात आला.
अभ्यासातील प्रमुख निष्कर्ष
जसजसा गोंगाट वाढत गेला, तसतसे सहभागी व्यक्तींची पापण्यांची उघडझाप करण्याची क्रिया कमी झाली.
यावरून संशोधकांनी निष्कर्ष काढला की, अवघड परिस्थितीत ऐकताना मेंदू अधिक एकाग्र होतो आणि अनावश्यक शारीरिक क्रिया तात्पुरत्या थांबवतो, ज्यात पापण्यांची उघडझापही येते.
विशेष म्हणजे, प्रयोगादरम्यान खोलीतील प्रकाशात बदल करूनही पापण्यांच्या हालचालीवर कोणताही परिणाम झाला नाही. यावरून हे सिद्ध झाले की, हा परिणाम ऐकण्याच्या श्रमाशी संबंधित आहे, द़ृश्यांशी नाही.