

वॉशिंग्टन : खगोलशास्त्रज्ञांनी ब्रह्मांडाच्या उत्पत्तीच्या पहाटेच्या म्हणजेच प्रारंभीच्या काळातील एका नव्या प्रकारच्या खगोलीय वस्तूचा शोध लावला आहे. हा एका ‘ब्लॅक होल स्टार’चा आजवरचा सर्वात भक्कम पुरावा असल्याचे मानले जात आहे.
हा शोध खरा ठरल्यास, जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने (JWST) शोधलेल्या ‘लिटल रेड डॉटस्’ (Little Red Dots - LRDs) या रहस्यमय तांबड्या प्रकाशाच्या स्रोतांचे गूढ उकलण्यास मोठी मदत होईल. विश्वाच्या सुरुवातीच्या काळातील हे शेकडो ठिपके ताऱ्यांपेक्षा खूप जास्त तेजस्वी आहेत; परंतु ते पूर्ण विकसित आकाशगंगांइतके मोठे नाहीत. यामुळेच आधुनिक खगोलशास्त्रातील हे एक मोठे कोड ठरले आहे. सूर्यमालेच्या आकाराचा हा नवीन ठिपका जेम्स वेब टेलिस्कोपच्या ‘मिराकल ऑर मिराज’ (MoM) सर्वेक्षण मोहिमेदरम्यान आढळून आला.
ऑगस्ट १२ रोजी ‘नेचर’ नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, हा तांबडा प्रकाश बिग बँगनंतर सुमारे ६६ कोटी वर्षांनी उत्सर्जित झाला होता, म्हणजेच जेव्हा विश्व त्याच्या सध्याच्या वयाच्या २० पट लहान होते. हा प्रकाश एका सामान्य ताऱ्यापेक्षा सुमारे १०० अब्ज पट जास्त तेजस्वी आहे. संशोधकांच्या मते, हा ठिपका म्हणजेच ‘ब्लॅक होल स्टार’ असू शकतो. ही एक अशी काल्पनिक किंवा प्रचंड मोठी खगोलीय रचना आहे, ज्यामध्ये एका मोठ्या कृष्णविवराभोवती वायूचे प्रचंड आणि अतिउष्ण कवच वेढलेले असते. संशोधकांनी या खगोलीय वस्तूला ‘MoM-BH-1’* असे नाव दिले आहे. अभ्यासाचे प्रमुख लेखक आणि युनिव्हर्सिटी ऑफ हवाईचे खगोलशास्त्रज्ञ रोहन नायडू यांनी सांगितले, ‘या खगोलीय वस्तूबाबतचे आमचे चित्र अतिशय वेगाने स्पष्ट होत आहे. अनेक अर्थांनी हा शोध खरोखरच अद्वितीय आणि अभूतपूर्व आहे.’