लहान वयातच चष्मा लागू नये म्हणून...

डोळ्यांचे आरोग्य राखण्यासाठी आहारात समाविष्ट करा हे पदार्थ
Best Foods for Eye Health and Eyesights
लहान वयात चष्मा लागू नये आहाराचे महत्त्व.Pudhari File Photo

पूर्वी चाळीशी पार केली की ‘चाळशी’ लागते, असे गृहीत धरले जात होते. मात्र, हल्ली सर्वांचाच ‘स्क्रीनटाईम’ वाढल्याने अगदी लहान वयातच चष्मा लागत आहे. लहान मुलं, किशोर व महाविद्यालयीन तरुण-तरुणींना मोबाईल, कॉम्प्युटर, टीव्ही यामुळे चष्मा लावावा लागत आहे. तो टाळण्यासाठी ‘स्क्रीनटाईम’ कमी करणे जसे गरजेचे आहे, तसेच आहारातून डोळ्यांच्या आरोग्याला पोषक अशा घटकांचे सेवन करणेही गरजेचे आहे. अशा आहाराविषयी तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती...

सुकामेवा : डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सुकामेवा आहारात समाविष्ट करणे लाभदायक ठरते. नट्स आणि सिड्समुळे डोळ्यांसाठीचे पोषक घटक शरीराला मिळतात. अक्रोड, काजू, बदाम यांच्याबरोबरच चिया सिड्स, फ्लॅक्स सिड्स आणि हेम्प सिड्सही लाभदायक ठरतात. त्यांच्यामध्ये डोळ्यांसाठी लाभदायक ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड, ‘ई’ व ‘अ’ जीवनसत्त्वे मिळतात.

आंबट फळे : लिंबू वर्गातील संत्री, मोसंबी यांसारखी फळे तसेच द्राक्षे, किवीसारखी अन्यही आंबट-गोड चवीची फळे डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहेत. यामुळे केवळ डोळ्यांनाच नव्हे, तर संपूर्ण शरीराच्या आरोग्यालाही लाभ होत असतो. या फळांमध्येही ‘अ’ व ‘ई’ जीवनसत्त्वे असतात.

मासे : डोळ्यांच्या आरोग्यासाठी मत्स्याहार उपयुक्त ठरतो. विशेषतः फॅटी फिशमध्ये ओमेगा-3 फॅटी अ‍ॅसिड असते, जे डोळ्यांना लाभदायक ठरते. टुना, सार्डिन, मॅकेरल, साल्मन आणि ट्राऊंटसारखे मासे आहारात असल्यास डोळ्यांना लाभ मिळतो.

हिरव्या भाज्या : हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश असणे हे डोळ्यांबरोबरच शरीराच्या संपूर्ण आरोग्यासाठी लाभदायक ठरते. पालकसारख्या भाज्या यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच ब्राेकोलीसारख्या अन्यही हिरव्या भाज्या यासाठी गुणकारी ठरू शकतात.

रताळे : द़ृष्टी सुधारण्यासाठी गाजराप्रमाणेच रताळीही उपयुक्त असतात. यामध्ये ‘ई’ जीवनसत्त्व, बीटा कॅरोटिन आणि काही गरजेची अँटिऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे रताळ्यांचे सेवन डोळ्यांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news