

टोकियो : युरोपियन स्पेस एजन्सी आणि जपान एरोस्पेस एक्सप्लोरेशन एजन्सी यांच्या दोन अब्ज डॉलर्सच्या ‘बेपीकोलंबो’ मोहिमेने आठ वर्षांच्या प्रवासानंतर २१ नोव्हेंबर रोजी बुध ग्रहाच्या कक्षेत प्रवेश केला. बुध ग्रहाच्या पृष्ठभागापासून ६३५ किलोमीटर उंचीवर असताना यानाचे थ्रस्टर ३७ मिनिटे सुरू राहणे अपेक्षित होते. मात्र, अवघ्या २८ मिनिटांतच ते अचानक बंद पडले. यामुळे जर्मनीतील नियंत्रण कक्षात मोठी खळबळ उडाली. चार तासांच्या सखोल विश्लेषणाअंती, यान बुधाच्या कक्षेत पोहोचल्याचे स्पष्ट झाले; परंतु ते ५८ तासांच्या कक्षेऐवजी ७५ तासांच्या आणि सुमारे १०,००० किलोमीटर अधिक उंच कक्षेत गेले आहे.
यानाच्या गायडन्स सॉफ्टवेअर आणि थ्रस्टर नियंत्रण प्रणालीमध्ये वेळेची विसंगती निर्माण झाल्याने हा बिघाड झाला. त्यामुळे यान ‘सेफ मोड’मध्ये गेले आणि वेग कमी करण्याची प्रक्रिया केवळ ७७ टक्केच पूर्ण होऊ शकली. सुदैवाने यान बुधाच्या गुरुत्वाकर्षणात अडकले, अन्यथा ते सूर्याच्या दिशेने भरकटले असते आणि मोहिमेचे मोठे नुकसान झाले असते.
पुढील आव्हाने आणि वैज्ञानिक महत्त्व
सप्टेंबरमध्ये मुख्य प्रोपल्शन मॉड्यूल वेगळे झाल्यानंतर प्रथमच नवीन प्रणालीद्वारे यानाचे नियंत्रण केले जात आहे. आता ९ डिसेंबर रोजी युरोप आणि जपानचे दोन स्वतंत्र ऑर्बिटर्स वेगळे करण्याची अत्यंत क्लिष्ट प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. सूर्याच्या प्रचंड उष्णतेत बुधाचे चुंबकीय क्षेत्र आणि गाभा यांचा अभ्यास करणारी ही तिसरीच मोहीम असून, एप्रिल २०२७ पासून प्रत्यक्ष वैज्ञानिक संशोधनाला सुरुवात होणार आहे.