

नवी दिल्ली : आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाला आरोग्य चांगले राखायचे असते; परंतु त्यासाठी आवश्यक असणार्या व्यायामाकडे लोक वेळेअभावी अनेकदा दुर्लक्ष करतात. अशा परिस्थितीत ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ जनरल मेडिसिन’मध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, दररोज फक्त 15 ते 20 मिनिटे चालणेदेखील आरोग्यासाठी चमत्कारीक ठरू शकते. विशेषतः, जेवणानंतर हलके चालणे शरीर आणि मन अशा दोघांसाठीही खूप फायदेशीर मानले जाते.
लोक जेवल्यानंतर अनेकदा बसतात किंवा झोपतात, जे त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकते, असे केल्याने अनेक पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, जेवणानंतर लगेच चालणे योग्य नाही; परंतु दर 10 ते 15 मिनिटांनी हलके चालल्याने पचनसंस्था सक्रिय राहते. त्यामुळे शरीराला अन्न योग्यरीत्या पचण्यास मदत होते आणि अनेक आजारांचा धोका कमी होतो.
रक्तशर्करेवर नियंत्रण
तज्ज्ञांच्या मते, जेवणानंतर रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, जी मधुमेहींसाठी धोकादायक ठरू शकते. अशा परिस्थितीत 15 मिनिटे चालणे रक्तशर्करेचे ऊर्जेमध्ये रूपांतर करण्यास मदत करते. त्यामुळे इन्सुलीन संवेदनशीलता वाढते आणि रक्तातील साखर नियंत्रणात राहते. म्हणूनच डॉक्टर जेवणानंतर हलके चालण्याचा सल्ला देतात.
मूडसह स्मरणशक्तीमध्ये सुधारणा
जेवणानंतर चालण्याने शरीरात ऑक्सिजनचा प्रवाह वाढतो, ज्याचा मेंदूवर थेट परिणाम होतो. त्यामुळे मेंदूचे कार्य सुधारते, ताण व चिंता कमी होते आणि मूड सुधारतो. नियमित चालणार्यांमध्ये स्मरणशक्ती आणि एकाग्रतेतही सुधारणा दिसून आली आहे.
पचनक्रिया राहील मजबूत
जर तुम्हाला पोट जड होणे, गॅस, आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल, तर जेवणानंतर चालणे हा रामबाण उपाय असू शकतो. हलके चालणे पोटातील रसांचे स्राव वाढवते, ज्यामुळे अन्न लवकर आणि योग्य रीतीने पचण्यास मदत होते. त्यामुळे पोट फुगणे आणि अपचनाचा त्रासदेखील कमी होते.
हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
जेवणानंतर दररोज चालण्याने रक्ताभिसरण सुधारते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित होण्यास मदत होते आणि शरीरातील वाईट कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. परिणामी, हृदयविकाराचा झटका आणि स्ट्रोक यांसारख्या गंभीर आजारांचा धोका कमी होतो. ही सवय दीर्घकाळ हृदय सक्षम राखण्यास मदत करते.