

आरोग्यासाठी गुणकारी असलेल्या भारतीय मसाल्यांमध्ये हळदीचा समावेश होतो. लग्नकार्यापासून स्वयंपाकापर्यंत सर्व ठिकाणी भारतात हळद दिसून येते. हळद ही औषधी गुणधर्मांनी समृद्ध असल्याने तिचा शारीरिकद़ृष्ट्या खूप फायदा होतो. हळदीच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच हळदीचा वापर आपण त्वचेच्या समस्या दूर करण्यासाठी करत असतो. हळद आपल्या आरोग्याला अनेक प्रकारे फायदेशीर ठरते. यामुळे आजारांशी लढण्याची क्षमता मिळते. शिवाय शरीरातील जळजळ कमी करण्याचेही काम करते. अर्थात, ‘अति सर्वत्र वर्जयेत’ हे इथेही लक्षात ठेवणे गरजेचे आहे. साधारणपणे हळदीच्या फायद्यांविषयी तुम्ही ऐकलं असेलच; पण हळदीच्या अतिसेवनाचे काही तोटेही आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? चला जाणून घेऊया...
शरीराला येणारी सूज आणि वेदना दूर करते
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते
त्वचेच्या समस्यांपासून सुटका मिळते
पचनक्रिया सुधारते
हृदयाचे आरोग्य सुधारते
कर्करोग प्रतिबंध करते
रोजच्या जेवणात हळदीचे प्रमाण जास्त होत असेल तर याने तुमच्या पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. ज्यामुळे तुम्हाला अतिसार, गॅस, पोट फुगणे अशा अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल.
हळद रक्त पातळ करण्याचे काम करते. जर तुम्ही आधीच रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल तर जास्त हळदीचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते.
प्रामुख्याने हळद ही उष्ण गुणधर्माची असते. यामुळे आहारात हळदीचे जास्त सेवन झाल्याने काही लोकांना अॅलर्जी देखील होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ, खाज सुटणे आणि सूज येणे अशा समस्या निर्माण होतात.
जास्त प्रमाणात हळदीचे सेवन केल्याने मुतखड्याची समस्या देखील उद्भवू शकते. याशिवाय तुम्हाला डोकेदुखीलाही सामोरे जावे लागू शकते.
जर तुम्ही यकृताच्या समस्येशी झगडत असाल तर हळदीचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. कारण यामुळे तुमची समस्या आणखी वाढू शकते.
गर्भवती महिलांनी देखील जास्त हळदीचे सेवन करू नये. कारण, यामुळे गर्भाशयाच्या स्नायूंना उत्तेजन मिळू शकते.