

मॉस्को ः आज दाढी ठेवणे हे अनेकांना भूषणावह वाटते. परंतु कधीकाळी एका देशात दाढी ठेवल्यास टॅक्स द्यावा लागायचा. कर न भरताच दाढी ठेवली तर पुरुषांना थेट शिक्षा केली जायची. हा कर रशियात ‘पिटर द ग्रेट’च्या शासनकाळात होता. 1698 साली हा कर लागू करण्यात आला होता.
सामाजिक सुधारणा करण्यासाठी पिटर द ग्रेटने हा कर लागू केला होता. दाढी हे पारपंरिकतेचे, मागासलेपणाचेही प्रतीक आहे, असे ‘पिटर द ग्रेट’ला वाटायचे. त्यामुळेच त्याने दाढीवर कर लागू केला होता. ‘पिटर द ग्रेट’ने युरोपचा दौरा केला होता. युरोपातील इंग्लंड, नेदरलँड, फ्रान्स यांसारख्या देशातील पुरुषांचे राहणीमान पाहून त्याने रशियात दाढीवर कर लावला होता. एखाद्या पुरुषाला धार्मिक किंवा वैयक्तिक आवड म्हणून दाढी ठेवायची असेल तर त्याला कर द्यावा लागायचा. एकदा कर भरला की पुरुषांना चांदी किंवा तांब्याचे टोकन दिले जायचे.
पुरुषांना हे टोकन सोबत ठेवावे लागायचे. या टोकनवर दाढी म्हणजे निरर्थक ओझं आहे, असं लिहिलेलं असायचं. व्यक्तीची सामाजिक स्थिती पाहून हा कर ठरवला जायचा. हा कर तब्बल 100 रुबलपर्यंत होता. कराचा हा नियम मोडला तर पुरुषांना शिक्षा दिली जायची. एखाद्या व्यक्तीकडे कर भरलेले टोकन नसेल तर पोलिस त्या व्यक्तीला पकडायचे. त्यानंतर सार्वजनिकरीत्या पोलिस त्या व्यक्तीची दाढी करायचे. या करातून मिळणारा महसूल नंतर विकासकामांसाठी, सैन्याच्या साहित्यासाठी वापरला जायचा.