

बीजिंग : चीनमधील मंदावलेली अर्थव्यवस्था आणि वाढत्या बेरोजगारीमुळे तिथल्या तरुणांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अनिश्चित भविष्याशी दोन हात करण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी चिनी तरुण आता एकाच खोलीत आणि चक्क एकाच खाटेवर अनोळखी व्यक्तीसोबत राहण्याचा (बेड शेअरिंग) मार्ग अवलंबत आहेत.
वुहान शहरातील २५ वर्षांची विनी झेंग एक सेल्स एजंट म्हणून काम करते. महिन्याला ४,००० युआन कमावणाऱ्या विनीने तिचे घराचे भाडे वाचवण्यासाठी आपल्या बेडरूममध्ये एका अनोळखी तरुणीला सहभागी करून घेतले आहे. यामुळे तिचे महिन्याला ४५० युआन वाचत आहेत. ‘हा केवळ जगण्याचा संघर्ष आहे. नोकरी गेली तर पैसे नसताना जगणे कठीण होईल,’ असे विनी सांगते.
चीनमधील ‘वीबो’आणि ‘ड्युइन’सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सध्या ‘बेड शेअरिंग’ हा विषय जोरदार चर्चेत आहे. ‘रेड’ या अॅपवर रूममेट शोधणाऱ्या हजारो पोस्ट शेअर केल्या जात आहेत. चीनमधील २६ कोटी भाडेकरूंपैकी ही पद्धत अजूनही काहींपुरती मर्यादित असली, तरी ती देशातील आर्थिक बेरोजगारी आणि तरुणांमधील वाढती असुरक्षितता स्पष्टपणे दाखवून देते. रुटगर्स युनिव्हर्सिटीचे संचालक मिंगवेई लिऊ यांच्या मते, ही परिस्थिती तरुणांमधील अनिश्चितता दर्शवते. जर ही मानसिकता अशीच पसरत गेली, तर कौटुंबिक खर्च, रिअल इस्टेटमधील मागणी आणि लग्नाचे प्रमाण घटू शकते, ज्यामुळे अर्थव्यवस्थेवर दीर्घकालीन परिणाम होईल.
फक्त विनीच नाही, तर ३९ वर्षांचे मॉर्गन पॅनदेखील एआय स्टार्ट-अपमधील नोकरी धोक्यात आल्यानंतर भाडे वाचवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीसोबत खोली शेअर करत आहेत. तर नागरी अभियांत्रिकी क्षेत्रातील नोकरी गमावलेला वांग नावाचा तरुणही भाड्याचा भार कमी करण्यासाठी रूममेटच्या शोधात आहे.
सध्या चिनी तरुण कपडे आणि बाहेरच्या जेवणावर होणारा खर्च टाळून अत्यंत साधेपणाने जगत आहेत. चीनमधील वाढती महागाई आणि कमी पगाराच्या समस्येमुळे तरुणांना आपल्या जीवनशैलीशी अशी तडजोड करावी लागत आहे.