Bear Cub Jump | अस्वलाच्या पिल्लाची धाडसी झेप ठरली पुरस्काराची मानकरी

Bear Cub Jump |
Bear Cub Jump | अस्वलाच्या पिल्लाची धाडसी झेप ठरली पुरस्काराची मानकरी
Published on: 
Updated on: 

न्यूयॉर्क : अस्वलांच्या आयुष्यातही माणसाप्रमाणेच कधीतरी निर्धाराने एक धाडसी झेप घ्यावी लागते. आग्नेय अलास्कातील टोंगास नॅशनल फॉरेस्ट येथील ‘ॲनन क्रीक’ परिसरात वावरणाऱ्या एका तपकिरी अस्वलाच्या (उर्सस आर्कटॉस) पिल्लाने यंदाच्या उन्हाळ्यात हाच धडा घेतला. त्याची आई ‘जेमिनी’ ही पाण्याचा प्रवाह ओलांडत होती आणि एक पिल्लू लगेचच पाण्यात उडी मारून पुढे गेला. मात्र हे दुसरे पिल्लू काहीसे साशंक होते. पाण्यात उडी मारण्यापूर्वी ते काठावरच रेंगाळत उभे राहिले. मात्र नंतर त्याने झेप घेतलीच! पाण्यात घेतलेल्या या जोरदार झेपेबद्दल पार्क रेंजर्सनी जेमिनीच्या या लहानग्या बछड्याला ‘२०२६ यिट ऑफ फेथ’ पुरस्काराने गौरवले आहे.

विशेष म्हणजे, यंदाचा ‘हेलिकॉप्टर मॉम’ पुरस्कार त्याची आई जेमिनी हिने पटकावला आहे. ‘‘पिल्ले त्यांच्या स्वतःच्या गतीने शिकतात आणि ॲननसारख्या अद्‌भुत निसर्ग स्थळांमुळे आम्हाला त्यांचे हे छोटेखानी विजय अगदी जवळून पाहता येतात,’’ असे रेंजर्सनी नमूद केले आहे. टोंगास नॅशनल फॉरेस्टचे रेंजर्स उन्हाळ्यात अलास्कातील ॲनन वन्यजीव वेधशाळेत आढळलेल्या ३९ अस्वलांना ‘ॲनन बेअर ॲवॉर्डस्‌’ देऊन सन्मानित करत आहेत. टोंगास हे अमेरिकेतील सर्वांत मोठे राष्ट्रीय जंगल असून, ते राज्याची राजधानी ज्युनोसह आग्नेय अलास्काचा बहुतांश भाग व्यापते.

या परिसरात मेंडेनहॉल हिमनदी (अलास्कातील क्रूझ पर्यटनाचे लोकप्रिय ठिकाण), अनेक ट्रेकिंग मार्ग, आकाशात घिरट्या घालणारे गरुड आणि अन्नाच्या शोधात फिरणारी असंख्य अस्वले पाहायला मिळतात. वन्यजीवांसाठी प्रमुख केंद्र असलेल्या ‘ॲनन क्रीक’मध्ये आग्नेय अलास्कातील गुलाबी सॅल्मन माशांचे सर्वांत मोठे समूह येतात. त्यामुळे हा प्रवाह काळ्या आणि तपकिरी अस्वलांसाठी मेजवानीचे अत्यंत लोकप्रिय ठिकाण बनले आहे.‘फ्रेंडस्‌ ऑफ ॲनन’च्या माहितीनुसार, ॲनन क्रीकमध्ये सॅल्मन माशांवर ताव मारणाऱ्या ३९ अस्वलांची नोंद आहे.

यामध्ये ३१ काळी अस्वले (उर्सस अमेरिकनस) आणि जेमिनी व तिच्या बछड्यांसारख्या आठ तपकिरी अस्वलांचा समावेश आहे. उत्तरेकडील कातमाई नॅशनल पार्कमधील धष्टपुष्ट अस्वलांप्रमाणेच, ही अस्वले दर उन्हाळ्यात दीर्घ हिवाळ्याच्या तयारीसाठी सॅल्मन मासे खाण्यास येथे परततात आणि जगण्यासाठी आपल्या बछड्यांना मासे पकडण्याचे धडे देतात. कातमाईमधील अस्वलांप्रमाणेच ॲनन क्रीक परिसरातील प्रत्येक अस्वलाच्या स्वतःच्या खास सवयी आणि लकबी आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.