

ल्हासा : कल्पना करा, तुम्ही हॉटेलच्या खोलीत आरामात विश्रांती घेत आहात आणि अचानक एक भले मोठे अस्वल दरवाजा तोडून तुमच्या समोर येऊन उभा राहिले तर? ऐकूनच अंगावर काटा आला ना? पण तिबेटमधील नागकू शहरात दोन पर्यटकांसोबत अशीच एक प्रत्यक्ष भीतीदायक घटना घडली. हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली ही घटना सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
हॉटेल बुक करताना लोक सहसा ढेकूण किंवा खराब सर्व्हिसला घाबरतात; पण तिबेटमध्ये जे घडले, त्याची कल्पनाही कोणी केली नसेल. नागकू शहरातील एका हॉटेलमध्ये शनिवारी एका तिबेटी तपकिरी अस्वलाने अचानक घुसखोरी केली. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसल्याप्रमाणे, हे अस्वल केवळ हॉटेलच्या लॉबीपुरते मर्यादित राहिले नाही, तर त्याने थेट एका खोलीच्या बंद दरवाजाला आपले लक्ष्य केले. अस्वलाने बंद दरवाजावर आपला पूर्ण भार टाकला आणि तोपर्यंत धक्का दिला, जोपर्यंत दरवाजा तुटला नाही. त्या खोलीत दोन पाहुणे विश्रांती घेत होते.
दरवाजा तुटताच अस्वल थेट खोलीच्या आत शिरले. खोलीत उपस्थित असलेल्या पर्यटकांनी सांगितले की, अस्वलाला समोर पाहून ते थक्कच झाले आणि त्यांची बोलतीच बंद झाली. काही सेकंद अस्वल आणि खोलीतील पाहुणे एकमेकांकडे पाहातच राहिले. सुदैवाने अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला नाही आणि काही क्षणातच ते स्वतःच खोलीबाहेर निघून गेले. खोलीत घुसण्यापूर्वी या अस्वलाने हॉटेलच्या फ्रंट डेस्क म्हणजेच रिसेप्शनवरही चांगलाच धुमाकूळ घातला होता. हॉटेलच्या मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर त्याने आधी रिसेप्शन काऊंटरची झडती घेतली.
तिथे ठेवलेल्या पाण्याच्या बाटल्या त्याने उचलल्या आणि पाणी पिण्याचा आनंद घेतला. तिथे थोडी तोडफोड केल्यानंतरच ते खोल्यांच्या दिशेने गेले होते. अस्वलाच्या एन्ट्रीमुळे हॉटेलमध्ये एकच खळबळ उडाली. मात्र, अस्वल खोलीतून बाहेर पडताच हॉटेल मालकाने दाखवलेले धैर्य कौतुकास्पद ठरले. मालकाने एका तीव्र प्रकाश असलेल्या टॉर्चच्या आणि इतर काही वस्तूंच्या मदतीने मोठा आवाज करून अस्वलाला घाबरवले. मालकाच्या या प्रसंगावधानामुळे अस्वल घाबरले आणि हॉटेलच्या इमारतीबाहेर पळून गेले. सुदैवाने या संपूर्ण घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही.