Bangladesh Carpet Factory | बांगला देशातील गालिचा कारखान्याला वास्तुकलेतील सर्वोच्च ‘रिबा’ पुरस्कार

Bangladesh Carpet Factory |
Bangladesh Carpet Factory | बांगला देशातील गालिचा कारखान्याला वास्तुकलेतील सर्वोच्च ‘रिबा’ पुरस्कार
Published on: 
Updated on: 

रंगपूर : शांत अंगणे, तळ्यांच्या कडेने जाणारे मार्ग आणि हिरव्यागार वनस्पतींनी वेढलेली इमारत... बांगला देशातील एका कापड कारखान्याने वास्तुकला क्षेत्रातील अत्यंत प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकून नवा इतिहास रचला आहे. उत्तर बांगला देशातील रंगपूर शहरात स्थित सात मजली ‘ग्रीन फील्ड फॅक्टरी’ला 'रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्‍टस्’चा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे.

सुमारे १,४४,००० चौरस फुटांवर पसरलेल्या या कारखान्याची निर्मिती ‘नक्शाबीद आर्किटेक्‍टस्’ या बांगला देशी कंपनीने केली आहे. पारंपरिक बंगाली घरांप्रमाणे अंगण आणि तळ्यांची रचना असलेल्या या इमारतीमध्ये निसर्गाला थेट कामाच्या ठिकाणी आणण्यात आले आहे. परीक्षकांनी या वास्तूचे वर्णन ‘शांत व विनम्र रचना’ असे केले आहे.

या कारखान्यात सुमारे ५,००० कामगार काम करतात, ज्यामध्ये बहुतांश महिला आहेत. कामगारांसाठी छतावर डे-केअर सेंटर (पाळणाघर), वैद्यकीय सुविधा आणि संवाद साधण्यासाठी सावलीच्या जागा तयार करण्यात आल्या आहेत. प्रवेशद्वारावर महिला सक्षमीकरणाचे प्रतीक असलेला भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. २०१३ च्या राणा प्लाझा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर, हा कारखाना कामगारांच्या सन्मानाचे आणि सुरक्षेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून समोर आला आहे.

‘समानतेचे प्रवेशद्वार’ आणि सामाजिक बदल

कारखान्यात मालक, व्यवस्थापक आणि सामान्य कामगारांसाठी एकच भव्य मध्यवर्ती प्रवेशद्वार आहे, त्यामुळे सामाजिक विषमता दूर करण्याचा संदेश मिळतो. वास्तुविशारद बायेजीद एम. खोंडोकर यांच्या मते, ‘कारखाना ही मानवी ऊर्जा संपवणारी मशीन नसून, ती ऊर्जा पुन्हा निर्माण करणारी जिवंत जागा असावी.’ ‘कारूपन्या रंगपूर लिमिटेड’द्वारे चालवला जाणारा हा कारखाना हस्तनिर्मित गालिचे आणि पायपुसण्या तयार करतो. बेल्जियम आणि पाश्चिमात्य देशातील इतर नामांकित प्रकल्पांना मागे टाकत या पर्यावरणपूरक कारखान्याने हा जागतिक गौरव मिळवला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news