लंडन : रोज सकाळी आणि रात्रीच्या वेळी ब्रश करूनही तोंडातून दुर्गंधी येत असेल, तर ही थोडीशी चिंतेची बाब ठरू शकते. खरोखरच अशी समस्या तुम्हाला सतावत असेल, तर 'ब्लड शुगर'ची तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरते.
'आईओएएसआर जर्नल ऑफ डेंटल अँड मेडिकल सायन्सेस'मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अमेरिकन संशोधनातील दाव्यानुसार ब्रश करूनही तोंडातून दुर्गंधी येत असेल, तर हे संकेत म्हणजे तुम्ही एकतर टाईप-2 डायबिटीसच्या विळख्यात सापडला असणार अथवा विळख्यात सापडण्याच्या मार्गावर आहात. या संशोधनातील माहितीनुसार मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांच्या केवळ रक्तातच ग्लुकोजचे प्रमाण जास्त असते, असे नाही. कारण, कधी कधी तोंडातील ग्लुकोजचे प्रमाणही जास्त असते. याच ग्लुकोजचा वापर तेथील किटाणू खाण्यासाठी करत असतात. यामुळे दात किडतात आणि हिरड्या सुजतात. यामुळे तोंडातून दुर्गंधी येण्यास सुरुवात होते. ही दुर्गंधी वारंवार दात ब्रश करूनही कमी होत नाही.
मुख्य संशोधक पॉल टर्नर यांनी सांगितले, की तोडांचे आरोग्य बिघडणे हे ब्लड शुगरचे संकेत ठरू शकतात. मधुमेह असलेल्या एखाद्या रुग्णाच्या जीभेवर लाल चट्टे उठले असतील, हिरड्या सुजल्या असतील आणि दातांमध्ये तीव्र वेदना जाणवत असतील, तर त्याच्या शरीरातील ब्लड शुगरचे प्रमाण वाढले आहे, असे समजावे. ते नियंत्रणात आणण्यासाठी संबंधिताने खाण्या-पिण्यावर तसेच व्यायामासाठी अतिरिक्त वेळ देण्याची गरज आहे.