

वॉशिंग्टन : सूर्यप्रकाश, हवा व पाणी यांच्या सहाय्याने वनस्पती पानांचा वापर करून प्रकाशसंश्लेषणाची क्रिया करतात. त्यामधून त्यांना ऊर्जा मिळत असते. वैज्ञानिकांनी कृत्रिम प्रकाशसंश्लेषणासाठी जीवाणूंना प्रशिक्षण देण्याचेही संशोधन केले असून त्यामुळे आगामी काळात सौरऊर्जेचे रासायनिक ऊर्जेत रूपांतर करणारे तंत्रज्ञान तयार करता येईल. या प्रयोगात मूरेला थर्मोअॅसेटिका नावाच्या जीवाणूंचा वापर अर्धवाहक नॅनो कणांच्या मदतीने संकरित व कृत्रिम प्रकाशसंश्लेषणासाठी करण्यात आला. त्यात सूर्यप्रकाशातील ऊर्जेचे रूपांतर रासायनिक उत्पादनात म्हणजेच रासायनिक ऊर्जेत करण्यात आले आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या लॉरेन्स बर्कले राष्ट्रीय प्रयोगशाळेत पिडाँग यांग यांनी हा प्रयोग केला असून त्यांनी सांगितले की, एम थर्मोअॅसेटिका या जीवाणूंचे गुणधर्म प्रकाशसंश्लेषणास अनुकूल नसतानाही त्यांच्यात कॅडमियम सल्फाईडचे नॅनो कण मिसळून कार्बन डायॉक्साईडपासून अॅसेटिक अॅसिड तयार करण्यात आले.
नैसर्गिक प्रकाशसंश्लेषणाची क्षमता यामध्ये गाठली गेली. जीवाणू व अकार्बनी प्रकाशसंश्लेषण प्रणाली यात तयार करण्यात आली व त्याची पुनरावृत्ती घडवता आली. त्यात कॅडमियम सल्फाईडच्या नॅनोकणांचा वापर करून जैवअवक्षेप तयार करण्यात आला. त्याच्या मदतीने पेशीय चयापचयात सूर्यप्रकाश पकडण्याची क्षमता निर्माण करण्यात आली. ही सायबोर्ग क्षमता असून त्यामुळे जैविक संस्थांची कार्यक्षमता वाढते. अकार्बनी रसायनशास्त्रामुळे जैविक व अजैविक घटकांचे एकात्मीकरण शक्य झाले त्यातून सौर ऊर्जेचे रूपांतर रासायनिक ऊर्जेत करण्यात आले. प्रकाशसंश्लेषणात निसर्गत: सूर्यप्रकाश साठवून त्याचा वापर कबरेदकांच्या संश्लेषणासाठी केला जातो. कृत्रिम प्रकाशसंश्लेषणात इंधने व प्लास्टिक तयार करण्याच्या स्वच्छ, हरित व शाश्वत तंत्रज्ञानाची निर्मिती करता येते. संशोधकांच्या मते कृत्रिम प्रकाशसंश्लेषण तंत्राने सौरऊर्जेतून रासायनिक ऊर्जा मिळवता येईल. एम थर्मोअॅसेटिका व कॅडमियम सल्फाइडचे नॅनो कण यांच्या मिश्रणातून कार्बन डायॉक्साईडपासून अॅसेटिक अॅसिड तयार करता आले, त्याचे प्रमाणही बरेच होते असे यांग यांचे मत आहे. कॅडमियम सल्फाईड हे अर्धवाहक असून त्याची बंध रचना वेगळी आहे व ते कृत्रिम प्रकाशसंश्लेषणात उपयुक्त आहे. एम थर्मोअॅसेटिका हे जीवाणू कृत्रिम प्रकाशसंश्लेषणात उपयुक्त आहेत. जीवशास्त्राची उत्प्रेरक शक्ती व अर्धवाहकांची प्रकाश साठवण क्षमता यांचा वापर यात करण्यात आला आहे. जैवघटक हे जैवरसायनशास्त्रात उपयोगी असतात व त्यांचे जैविक उपयोगही असतात. हे संशोधन जर्नल ‘सायन्स’मध्ये प्रसिद्ध झालेले आहे.