
लंडन : काही वर्षांपूर्वी एक ‘आक्रित’ घडले होते. जून 2022 मध्ये, Churine Baumgartner, आईसलँडिक ऑर्का प्रोजेक्टमधील संशोधक शेरीन बौमगार्टनर या हेरिंग मासळी खात असलेल्या ऑर्का (किलर व्हेल) समूहावर निरीक्षण करत होत्या. अचानक, त्यांनी एका फारच लहान व अनोख्या रंगाच्या पिल्लाला पाहिलं जे पारंपरिक काळा व फिकट नारिंगी रंग असलेल्या ऑर्का पिल्लांसारखं अजिबात नव्हते. काही क्षणातच तिला समजले की ते ऑर्का पिल्लू नव्हते, तर एक वेगळ्याच प्रजातीचं, पायलट व्हेलचे पिल्लू होते!
बौमगार्टनर आणि त्यांच्या टीमने जवळपास तीन तास त्या ऑर्का समूहाचं निरीक्षण केलं. दुसर्या दिवशी पुन्हा तो समूह सापडला, पण पायलट व्हेलचं पिल्लू गायब झालं होतं. 2021 ते 2023 दरम्यान, संशोधकांनी दरवर्षी अशा घटना पाहिल्या, वेगवेगळ्या पायलट व्हेल पिल्लांसह वेगवेगळे ऑर्का समूह. बौमगार्टनर व त्यांच्या सहकार्यांनी ‘इकॉलॉजी अँड इव्होल्युशन’ या शास्त्रीय नियतकालिकात प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात 2022 व 2023 मधील दोन घटनांचे सविस्तर वर्णन केले आणि त्यामागील तीन संभाव्य कारणे मांडली, शिकारीसाठी, खेळासाठी किंवा पालकत्वासाठी.
या सर्व घटनांमध्ये, आठवडाभराचं पायलट व्हेल पिल्लू एका मादी ऑर्काच्या बाजूने व किंचित मागे, वैज्ञानिक भाषेत ‘echelon position' मध्ये पोहताना दिसलं. कधी कधी ऑर्का त्या पिल्लाला सौम्य धक्का देऊन पुढे ढकलत होती. 2023 मध्ये तर पिल्लू कधी कधी समूहाच्या पुढे जात होतं, जणू पळण्याचा प्रयत्न करत होतं. एका प्रसंगी, ते ऑर्काच्या पाठीवर उलटं (पोट वर करून) उचललं गेलं होतं. कदाचित ऑर्का या पिल्लांना ’जिवंत टिफिन बॉक्स’सारखं ठेवत असतील. काही आयस्लंडिक ऑर्का सील आणि पोर्पॉईस खातात.
पण बौमगार्टनर सांगतात की, या निरीक्षणांमध्ये ऑर्कांनी कोणतीही आक्रमकता दाखवली नाही, आणि आईसलँडमधील बहुतांश ऑर्का माशांवर उपजीविका करतात. त्यामुळे ही शक्यता कमी आहे पण पूर्णपणे नाकारता येत नाही. खेळ किंवा कुतूहल ही प्राण्यांमध्ये सामान्य गोष्ट आहे. या अनोख्या आंतरप्रजाती संवादाचे स्वरूप खेळाशी संबंधित असू शकते. काही ऑर्का माद्यांमध्ये मातृत्वाची भावना इतकी प्रबळ असते की त्या दुसर्या प्रजातीच्या पिल्लांची देखील काळजी घेतात. ‘echelon position' हे नवजात व्हेल्स आणि त्यांच्या मातांमध्ये सामान्यतः दिसणारं पोझिशन आहे त्यामुळे ही शक्यताही वाव घेऊ शकते.