

नवी दिल्ली : एलन मस्क यांची आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय) कंपनी एक्सएआय आता लहान मुलांसाठी एक खास आणि सुरक्षित अॅप तयार करणार आहे. ‘बेबी ग्रोक’ नावाचे हे अॅप मस्क यांच्या प्रसिद्ध ‘ग्रोक’ चॅटबॉटचे लहान मुलांसाठी पूरक असे (किडस् फे्रंडली) व्हर्जन असेल. मस्क यांनी स्वतः सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर ही घोषणा केली.
मस्क यांनी सांगितले की, ‘बेबी ग्रोक’ हे मुलांच्या गरजेनुसार तयार केलेले एक स्वतंत्र अॅप असेल, जे त्यांना सुरक्षित आणि योग्य कंटेंट देईल. ‘बेबी ग्रोक’च्या माध्यमातून कंपनी तंत्रज्ञानाचा एक सकारात्मक आणि सुरक्षित वापर मुलांपर्यंत पोहोचवू इच्छिते. हे नवे एक्स एआयच्या शक्तिशाली ‘ग्रोक 4’ (Grok 4) मॉडेलवर आधारित असण्याची शक्यता आहे. ‘ग्रोक 4’ हे कंपनीचे सर्वात नवीन एआय मॉडेल असून, मागील व्हर्जनवरील टीकेनंतर त्यात मोठे बदल करण्यात आले आहेत. या मॉडेलने मल्टिटास्क भाषा समजणे, जटिल समस्या सोडवणे आणि तार्किक क्षमता अशा अनेक तांत्रिक बेंचमार्कवर उत्कृष्ट कामगिरी केली आहे. याच्या प्रगत क्षमतेमुळेच ‘सुपरग्रोक हेवी’ नावाची प्रीमियम सबस्क्रिप्शन सेवाही सुरू करण्यात आली आहे.
यासोबतच, ‘एक्सएआय’ने अमेरिकन सरकारी एजन्सींसाठी ‘ग्रोक फॉर गव्हर्न्मेंट’ मॉडेलही सादर केले आहे. फायनान्शियल टाईम्सच्या वृत्तानुसार, कंपनी तब्बल 200 अब्ज डॉलर्सचा निधी उभारण्याच्या तयारीत आहे, ज्यामुळे ती जगातील सर्वात मोठ्या एआय कंपन्यांपैकी एक बनू शकते. ‘बेबी ग्रोक’ची घोषणा हे ‘एक्सएआय’च्या वाढत्या विस्ताराचेच एक प्रतीक मानले जात आहे.
‘बेबी ग्रोक’ हा मस्क यांच्या सध्याच्या ‘ग्रोक’ या एआय चॅटबॉटचे लहान मुलांसाठी तयार केलेले खास व्हर्जन आहे. हे अॅप मुलांची भाषा, त्यांची समज आणि आवडी-निवडी लक्षात घेऊन माहिती सादर करेल. त्यामुळे मुलांना कंटाळा न येता नवनवीन गोष्टी शिकता येतील. हा एक असा एआय मित्र असेल, जो मुलांशी त्यांच्याच भाषेत संवाद साधेल.
‘बेबी ग्रोक’ हे लहान मुलांच्या जगात तंत्रज्ञानाचा सुरक्षितपणे प्रवेश घडवून आणणारे एक महत्त्वाचे पाऊल ठरू शकते. यामुळे मुलांच्या शिक्षणाला आणि सर्जनशीलतेला नवी दिशा मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. आता हे एआय अॅप प्रत्यक्षात आल्यावर मुलांच्या आणि पालकांच्या किती पसंतीस उतरते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
‘बेबी ग्रोक’ हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून, मुलांच्या बौद्धिक विकासासाठीही ते फायदेशीर ठरू शकते, याचे काही प्रमुख फायदे खालीलप्रमाणे आहेत :
सुरक्षित माहिती : बेबी ग्रोक मुलांसाठी एक सुरक्षित एआय मित्र बनेल, जो कोणतीही अयोग्य किंवा चुकीची माहिती न दाखवता फक्त त्यांच्यासाठी उपयुक्त गोष्टीच सादर करेल.
खेळता-खेळता शिक्षण : या अॅपमध्ये शैक्षणिक खेळ, प्रश्नमंजूषा आणि गोष्टी सांगण्यासारखे फीचर्स असू शकतात. यामुळे मुले खेळता-खेळता अनेक नवीन गोष्टी शिकतील आणि त्यांची शिकण्याची आवड वाढेल.
कौशल्य विकास : एआय अॅपसोबत संवाद साधल्याने मुलांची भाषा सुधारेल, तर्क लावण्याची क्षमता वाढेल आणि प्रश्न विचारण्याची सवय लागेल. यामुळे त्यांच्या सर्जनशील विचारांना चालना मिळेल.
पालकांसाठी नियंत्रण : या अॅपमध्ये पालकांसाठी काही विशेष नियंत्रणे दिली जाण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पालक आपल्या मुलांच्या अॅप वापरावर लक्ष ठेवू शकतील आणि त्यांच्यासाठी योग्य माहिती निवडू शकतील.