August Astronomical Events | ऑगस्ट महिन्यात घडणार अनेक खगोलीय घटना

 August Astronomical Events |
August Astronomical Events | ऑगस्ट महिन्यात घडणार अनेक खगोलीय घटना
Published on
Updated on

जर तुम्हाला रात्रीच्या अंधारात चमचमणारे तारे आणि आकाशातील रहस्ये पाहायला आवडत असतील, तर ऑगस्टचा महिना तुमच्यासाठी अत्यंत खास ठरणार आहे. या एकाच महिन्यात अंतराळात अशा अद्‌भुत आणि दुर्मीळ खगोलीय घटना घडणार आहेत, ज्या शतकातून एखाद्या वेळीच पाहायला मिळतात. या ऑगस्टमध्ये आकाश फक्त तारेच चमकवणार नाही, तर दिवसाच्या प्रकाशात सूर्य झाकला जाईल आणि रात्री तुटणाऱ्या ताऱ्यांची बरसात होईल. एकीकडे खग्रास सूर्यग्रहणामुळे दिवसाही अचानक अंधार पडेल, तर दुसरीकडे ‘ब्लड मून’ रात्री लाल रंगाची छटा पसरेल. एवढेच नाही, तर पर्सिडस्‌ उल्कावर्षाव आणि शनी ग्रहाचे सर्वात तेजस्वी रूपही याच ऑगस्ट महिन्यात पाहायला मिळणार आहे. एकूणच, ऑगस्ट २०२६ मध्ये आकाशात अनेक मोठ्या खगोलीय घटना घडणार आहेत, ज्या पाहण्याची संधी तुम्ही अजिबात गमावू नये. चला तर मग जाणून घेऊया या सर्व घटनांची सविस्तर माहिती...

चंद्र आणि मंगळाची अद्‌भुत युती

महिन्याची सुरुवात १ ऑगस्ट रोजी सूर्यास्तानंतर चंद्र आणि मंगळाच्या अद्‌भुत युतीने झाली. यानंतर ५ ऑगस्ट रोजी संपूर्ण रात्रभर शनी ग्रह अपोझिशन (Opposition) स्थितीत राहील, ज्यामुळे शनीला पाहण्यासाठी हा सर्वात योग्य काळ मानला जाईल.

खग्रास सूर्यग्रहण (१२ ऑगस्ट)

याच महिन्यात १२ तारखेला खग्रास सूर्यग्रहण होणार आहे, ज्यामुळे दिवसाच अंधार पसरणार आहे. हे खग्रास सूर्यग्रहण ग्रीनलँड, आईसलँड, उत्तर स्पेन आणि आर्क्टिक प्रदेशातून दिसून येईल, तर अंशिक सूर्यग्रहण युरोप, उत्तर-पश्चिम आफ्रिका आणि पश्चिम आशियाच्या अनेक भागांत पाहायला मिळेल. मात्र, १२ ऑगस्ट रोजी होणारे हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नाही. हे सूर्यग्रहण १२ ऑगस्ट रोजी दुपारी १.३७ वाजता सुरू होईल आणि यादरम्यान चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकेल, ज्यामुळे दिवसा अंधार होईल.

पर्सिडस्‌ उल्कावर्षाव

सूर्यग्रहणानंतर लगेचच १२ ऑगस्टच्या रात्री ९.५६ वाजण्‍याच्‍या सुमारास पर्सिडस्‌ उल्कांचा वर्षाव होईल. हा जगातील सर्वात प्रसिद्ध उल्कावर्षावांपैकी एक आहे, ज्यामध्ये दर तासाला ५० ते १०० तुटणारे तारे पाहिले जाऊ शकतात. यावेळी चंद्राचा प्रकाश कमी असल्याने भारत, युरोप, उत्तर अमेरिका आणि आशियातील बहुतांश भागात हा नयनरम्य नजारा अत्यंत स्पष्टपणे दिसेल.

तेजस्वी शुक्र

१५ ऑगस्ट रोजी रात्री १.५९ वाजता शुक्र ग्रह आपल्या सर्वात तेजस्वी रूपात दिसेल आणि २० ऑगस्ट रोजी रात्री १०.४६ वाजता चंद्र पहिल्या तिथीच्या टप्प्यात (First Quarter Moon) दिसेल.

ब्लड मून (२८ ऑगस्ट)

महिन्याच्या शेवटी २८ ऑगस्ट रोजी मध्यरात्री १२.१४ वाजता एक गडद अंशिक चंद्रग्रहण पाहायला मिळेल आणि बरोबर १२.१८ वाजता पूर्ण ‘स्टरजन मून’ दिसेल. चंद्रग्रहणादरम्यान चंद्राचा सुमारे ९६ टक्के भाग पृथ्वीच्या गडद सावलीत येईल, ज्यामुळे तो गडद लाल रंगाचा दिसेल. यालाच ‘ब्लड मून’ असे म्हणतात. हा ब्लड मून युरोप, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलियाच्या काही भागांत दिसू शकतो, तर भारतात त्याची दृश्यता ही चंद्रोदयाच्या स्थानिक वेळेवर अवलंबून असेल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news